बाळगंगा घोटाळा प्रकरणी तिघांना अटक व कोठडी
By admin | Published: October 26, 2016 02:50 AM2016-10-26T02:50:11+5:302016-10-26T02:50:11+5:30
बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली.
ठाणे : बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांना ठाण्याच्या सत्र न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपपत्राची प्रत दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले.
वर्षभरापूर्वीच या प्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबर यांच्यासह दहा जणांविरोधात ३० हजार पानांचे आरोपपत्र ८ आॅगस्ट रोजी ठाण्याच्या विशेष न्यायालयात एसीबीने दाखल केले होते. आरोपपत्र दाखल होऊनही या तिघांना अटक झालेली नव्हती. न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याने पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी आरोपपत्रासह हजर केले. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात चौकशीचे आदेश ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष चौकशी पथकाने याप्रकरणाची चौकशी करुन २५ आॅगस्ट २०१५ ला कोपरी
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे, तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कंन्स्ट्रक्शन आणि एफए इंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी खत्री, निसार खत्री, अबीद खत्री, झाहीद खत्री, रिठे, कासट यांना अटक झाली. (प्रतिनिधी)