तीन बड्या सराफांना प्राप्तिकर विभागाने केले पाचारण
By admin | Published: January 23, 2017 03:43 AM2017-01-23T03:43:55+5:302017-01-23T03:43:55+5:30
नोटाबंदीनंतर दोन ते तीन दिवसांतच अकोल्यातील खंडेलवाल अलंकार केंद्र, विश्वकर्मा ज्वेलर्स आणि केजे स्क्वेअरच्या या बड्या सराफा
सचिन राऊत / अकोला
नोटाबंदीनंतर दोन ते तीन दिवसांतच अकोल्यातील खंडेलवाल अलंकार केंद्र, विश्वकर्मा ज्वेलर्स आणि केजे स्क्वेअरच्या या बड्या सराफा प्रतिष्ठानांमधून कोट्यवधी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळले आहे. यासंदर्भातील दस्तावेज त्यांनी जप्त केले आहे. यासंदर्भात माहिती सादर करण्यासाठी सोमवारी नागपूर येथील आयकर भवनमध्ये हजर राहण्याचे या संचालकांना सांगण्यात आले आहे.
प्राप्तिकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने बुधवारी छापे टाकले होते. तीनही ज्वेलर्समधून नोटाबंदीच्या कालावधीत सोने-खरेदी विक्रीच्या देयकांची आणि दस्तावेजांची तपासणी केली. या तपासणीत तीनही ज्वेलर्समधून झालेली सोने व चांदीची खरेदी-विक्री संशयास्पद असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी ज्वेलर्सच्या संचालकांना यासंदर्भात विचारणा केली आहे; मात्र संचालकांनी त्यासाठी वेळ मागितल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.