दोन भावांसह तीन आरोपी ३१ वर्षांनी खुनातून निर्दोष

By admin | Published: December 10, 2015 03:08 AM2015-12-10T03:08:39+5:302015-12-10T03:08:39+5:30

धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत

Three brothers, including two brothers, have been acquitted in the murder of 31 years | दोन भावांसह तीन आरोपी ३१ वर्षांनी खुनातून निर्दोष

दोन भावांसह तीन आरोपी ३१ वर्षांनी खुनातून निर्दोष

Next

मुंबई : धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत, दोन भावांसह तीन आरोपींची अपिलात निर्दोष मुक्तता केली.
नॅशनल पार्कमध्ये सहलीला जातो असे सांगून ढाकेधाके कॉलनी, एस. व्ही.रोड, अंधेरी (प.) येथील राहत्या घरातून १५ नोव्हेंबर १९८४ रोजी बाहेर पडलेल्या अदिल रशिदचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील दुर्वेश गावी पांडु पराडे या गावकऱ्यास प्रातर्विधीसाठी गेला असताना आढळला होता. आधी अदिल हरवल्याची तक्रार देणाऱ्या रझिया सुलताना या अदिलच्या बहिणीने खुनाचा संशय व्यक्त करणारी फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी सईद अहमद हाजी अब्दुल रझाक मिस्त्री, झहीर व जमील ही त्यांची दोन मुले आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अब्दुल वाजीद ऊर्फ गुड्डु ऊर्फ अब्दुल जब्बार अब्दुल गनी शेखअशा चार आरोपींविरुद्ध खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने मार्च १९९५ मध्ये चौघांनाही जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध चारही आरोपींनी केलेले अपील गेली २० वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित होते. दरम्यान आरोपी सईद अहमद मिस्त्री यांचे निधन झाले. न्या. बी. पी. धमार्धिकारी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर झहीर, जमील व अब्दुल वाजीद या तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात अभियोग पक्षाने २१ साक्षीदार तपासले असले तरी तो प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. विशेषत: खून खटल्यात गुन्हा केवळ आरोपींनीच केला आहे, असे दर्शविणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची नि:संदिग्ध व अखंड साखळी दिसत असेल तरच आरोपींना दोषी ठरविता येते. प्रस्तुत प्रकरणात तशी स्थिती नसल्याने संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)
न्यायालयाची अन्य निरीक्षणे
अदिल रशिदच्या मृत्यूपूर्वी आरोपीच शेवटी त्याच्यासोबत होते, हा परिस्थितीजन्य पुरावाही नि:संशय नाही. कारण अदिल आरोपींसोबत घरातून बाहेर पडणे आणि त्याचा मृतदेह दुर्वेश गावात आढळणे या दरम्यान बराच काळ उलटून गेला होता. त्यामुळे दरम्यानच्या काळात अन्य कोणी अदिलचे बरेवाईट केले असण्याची शक्यता अगदीच अशक्यकोटीतील नाही.
प्रवासासाठी ज्याच्याकडून अ‍ॅम्बॅसेडर मोटार भाड्याने घेतली होती त्या किशोर दधिच या ट्रॅव्हल एजन्टजवळ ‘आमच्याकडून एक खून झाला आहे,’ अशी आरोपींनी दिलेली कथित कबुली विश्वासार्ह नाही.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधाशोध सुरू केल्यावर आरोपी मिस्त्री पिता-पुत्र मेरठला पळून गेले होते, हा प्रतिकूल परिस्थितीजन्य पुरावा मानून सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. परंतु ते चूक ठरविताना उच्च न्यायालयाने म्हटले की, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा बचाव करणे ही स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे अन्य काही सबळ पुरावा नसेल तर आरोपी पळून गेले होते एवढ्यावरून त्यांना दोषी धरता येणार नाही.

Web Title: Three brothers, including two brothers, have been acquitted in the murder of 31 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.