दारूकांड प्रकरणात तिघे गजाआड
By Admin | Published: July 18, 2015 01:09 AM2015-07-18T01:09:43+5:302015-07-18T01:09:43+5:30
मालवणी दारूकांडाच्या गुन्ह्यात शुक्रवारी गुन्हे शाखेने आणखी तिघांना गजाआड केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरातमधील जर्मन इंक कंपनीच्या मालकाचा समावेश आहे.
मुंबई : मालवणी दारूकांडाच्या गुन्ह्यात शुक्रवारी गुन्हे शाखेने आणखी तिघांना गजाआड केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरातमधील जर्मन इंक कंपनीच्या मालकाचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये त्याने मुंबई, महाराष्ट्रातल्या गावठीच्या रॅकेटला मोठ्या प्रमाणावर अवैधपणे इथेनॉल (इथाइल अल्कोहोल) पुरविल्याचा आरोप आहे.
लीलाधर पटेल (५७) असे त्याचे नाव आहे. तो जर्मन इंक या कंपनीचा मालक असून, वापीचा रहिवासी आहे. त्याला ३० ते ३३ हजार लीटर इथेनॉल साठा करण्याची परवानगी आहे. मात्र यातील साठा तो अवैधपणे मुंबईतल्या गावठी दारू विकणाऱ्यांना पुरवत होता. मालवणीतल्या गुत्त्यांवरील गावठीत लीलाधरच्या कंपनीचे इथेनॉल मिसळले जात असे, असे गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आले होते.
गुन्हे शाखेने गुजरातच्या म्हेसाणा जिल्ह्यात राहणाऱ्या प्रकाश पटेल (४२) याला गजाआड केले आहे. मालवणी दारूकांडातला मुख्य आरोपी आतिक याला मिथेनॉल पुरवणाऱ्यांमध्ये प्रकाशचा मोठा सहभाग होता. तर मालवणीत गुत्ता चालवणाऱ्या गीता ऊर्फ सिमरन फिरोज सय्यद या महिलेलाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
लीलाधर पटेलला ३० ते ३३ हजार लीटर इथेनॉल साठा करण्याची परवानगी आहे. मात्र यातील साठा तो अवैधपणे मुंबईतल्या गावठी दारू विकणाऱ्यांना विशेषत: मालवणीतील गुत्त्यांना पुरवत होता.