चित्रा वाघ यांच्या पतीसह तिघांना कोठडी
By admin | Published: July 6, 2016 01:26 AM2016-07-06T01:26:33+5:302016-07-06T01:26:33+5:30
चार लाखांची लाच घेत असताना अटक केलेल्या परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकासह तिघा जणांना मंगळवारी, १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : चार लाखांची लाच घेत असताना अटक केलेल्या परळ येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकासह तिघा जणांना मंगळवारी, १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तुळशीराम भगत (४८), वैद्यकीय रेकॉर्ड ग्रंथपाल किशोर जगन्नाथ वाघ (५०) व खाजगी इसम संदेश भास्कर कांबळे (४५) यांना एसीबीने सोमवारी रात्री हिंदमाता येथील समर्थ हॉटेल जवळ लाच घेताना पकडले होते. किशोर वाघ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती आहेत. या कारवाईबाबत आज राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू होती.
गांधी रुग्णालयात ९ वर्षांपूर्वी एका रुग्णावर पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ग्रंथपाल किशोर वाघ यांनी याचिकाकर्त्याला ‘तुम्हाला १५ लाख रुपये मिळवून देतो तसेच मृत भावाच्या मुलाला ईएसआयएसमध्ये नोकरी मिळवून देतो,’ असे सांगून त्यासाठी ४ लाखांची मागणी केली होती. (प्रतिनिधी)
चित्रा वाघ यांचा कांगावा : किशोर वाघ याला ताब्यात घेतल्यानंतर पथक त्यांचा परळ येथील क्वार्टरर्समध्ये झडती घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची पत्नी चित्रा वाघ यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास अटकाव केला. माझा पती निर्दोश आहे. सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात येत असल्याचा कांगावा त्यांनी केला. त्यामुळे सुमारे तासभर कारवाई रखडली होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य समज दिल्यानंतर चित्रा वाघ नरमल्या. वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदांसोबतच राज्य महिला आयोगाच्या सदस्या म्हणून काम केले आहे.