लागोपाठ होणारी तीन ग्रहणे अशुभ नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:24 AM2020-06-02T05:24:25+5:302020-06-02T05:24:50+5:30
दा. कृ. सोमण : ५ व २१ जूनची चंद्रग्रहणे भारतातून दिसणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : या वेळी लागोपाठ तीन ग्रहणे होत असल्याने ती अशुभ असून, काहीतरी वाईट घटना घडतील, असे भाकीत काही ज्योतिषांनी वर्तविले आहे. त्यात काहीही तथ्य नसल्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
या वर्षी आलेल्या ग्रहणांविषयी सोमण यांनी सांगितले की, शुक्रवार ५ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. भारतातून हे चंद्रग्रहण ५ जून रोजी रात्री ११ वाजून १३ मिनिटांपासून उत्तररात्री २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत दिसणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारताप्रमाणेच प्रशांत महासागर, आॅस्ट्रेलिया, यूरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व दक्षिण प्रदेश येथून दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेत आल्याने पौर्णिमा असूनही कमी तेजस्वी दिसते.
रविवार, २१ जून रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. मुंबईतून हे सूर्यग्रहण सकाळी १० वाजून १ मिनिटांपासून दुपारी १ वाजून २८ मिनिटांपर्यंत दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलईस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.
रविवार, ५ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी होणारे छायाकल्प (मांद्य) चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड येथून दिसेल.
यापूर्वीही झाली आहेत अशी ग्रहणे
यापूर्वी २०१८ मध्ये १३ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, २७ जुलै रोजी खग्रास चंद्रग्रहण आणि ११ आॅगस्ट रोजी खंडग्रास सूर्यग्रहण झाले होते. या वर्षी लागोपाठ होणाऱ्या तीन ग्रहणांनंतर सन २०२९ मध्ये १२ जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण, २६ जून रोजी खग्रास चंद्रग्रहण आणि ११ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहणे हा नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे . त्यांचा पृथ्वीवर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.