एटीएममधील तीन कोटी ३३ लाखावर डल्ला

By admin | Published: November 16, 2016 09:25 PM2016-11-16T21:25:37+5:302016-11-16T21:25:37+5:30

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने जिल्ह्यातील बँका व एटीएमवर ताण वाढला असतानाच, जिल्ह्यातील १७ एटीएममधील तीन कोटी ३३ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

Three crore 33 lakh taka at ATM | एटीएममधील तीन कोटी ३३ लाखावर डल्ला

एटीएममधील तीन कोटी ३३ लाखावर डल्ला

Next

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १६ : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने जिल्ह्यातील बँका व एटीएमवर ताण वाढला असतानाच, जिल्ह्यातील १७ एटीएममधील तीन कोटी ३३ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पैसे भरणा करणाऱ्या कंपनीच्या मिरजेतील दोन कर्मचाऱ्यांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराने जिल्ह्यातील बँकांचे धाबे दणाणले आहे. अटक केलेल्यांत लियाकत सरफराज खान (वय ३३) व अश्फाक अस्लम बैराजदार (२१, दोघे, रा. मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

जिल्ह्यातील १७ एटीएममध्ये बँकेकडील पैसे भरण्याचा ठेका सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीचे व्यवस्थापन मनमोहन जगदीश सिंग (भगवती लाईन, उत्तमनगर, न्यू दिल्ली) यांच्याकडे आहे. या कंपनीकडे लियाकत खान व अश्फाक बैराजदार कामगार म्हणून काम करतात. या दोघांवर जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळसह शहरातील बँक आॅफ इंडिया, युनायटेड बँक या बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. बँकांच्या मुख्य शाखांतून रक्कम घेऊन ती एटीएममध्ये भरण्यात येत होती. आठ नोव्हेंबररोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या गेल्या. त्यानंतर सर्वच बँकांनी जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा एटीएममधून परत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या बँकांनी आपापल्या एटीएममधील उपलब्ध रकमेची पडताळणी केली.

ही प्रक्रिया १४ नोव्हेंबररोजी करण्यात आली. तेव्हा एटीएममधील रकमेत तफावत आढळून आली. यात युनायटेड बँकेच्या कुपवाड व लक्ष्मीनगर, बँक आॅफ इंडियाच्या कवठेमहांकाळ, माधवनगर, बसस्थानक, सांगली मुख्य शाखा, विश्रामबाग, खानापूर, जत, बेडग, मिरज-मालगाव रोड, भिवघाट, झरे, विश्रामबाग येथील एटीएममध्ये कमी रक्कम असल्याचे आढळून आले. एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रक्कम, ग्राहकांनी काढलेली रक्कम आणि शिलकीची रक्कम याचा ठोकताळा करता, ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये कमी आढळून आले.

या बँकांनी कंपनीचे व्यवस्थापक मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. मनमोहन सिंग यांनी याप्रकरणी लियाकत खान व अश्फाक बैराजदार या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली. सायंकाळी पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती.


आणखी रकमेच्या अपहाराचा संशय
जिल्ह्यातील १७ एटीएममधील तीन कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले असले तरी, या दोन संशयितांनी आणखी काही रकमेवर डल्ला मारला आहे का, याची विश्रामबाग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक सरोजिनी पाटील यांनी, अपहाराच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Three crore 33 lakh taka at ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.