मातंग समाजातील तरुणांसाठीच्या तीन कोटींच्या गाड्या सडल्या
By यदू जोशी | Published: August 23, 2019 02:45 AM2019-08-23T02:45:08+5:302019-08-23T06:30:36+5:30
या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती.
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार मातंग तरुणांना भाजी विक्रीसाठी पुरविण्यात यावयाच्या तब्बल तीन कोटी रुपयांच्या ४१ गाड्या सडल्या असून आता त्या भंगारात विकण्याशिवाय पर्याय नाही अशा अवस्थेत आहेत.
या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती. ५९ गाड्या वाटण्यात आल्या. ४१ गाड्या कुठे गेल्या हे समजायला मार्ग नव्हता. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पगारे यांनी दोन दिवसांपूर्वी या गाड्या जेथे आहेत येथे भेट दिली असता त्या गंजलेल्या अवस्थेत आढळल्या. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या खडवली येथे एका मैदानावर त्या पडून असल्याचे आढळले.
या गाड्या आता बंद अवस्थेत आहेत. त्यांचे इंजिन पूर्णत: निकामी झाले. टायर, पत्रे सडले आहेत. भंगारात कवडीमोल विकणे हा एकच पर्याय उरला आहे. सदर प्रतिनिधीने गुरुवारी या ठिकाणी भेट दिली तेव्हा गाड्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. धक्कादायक म्हणजे गेली चार वर्षे ही वाहने आहे त्या अवस्थेत तशीच पडून होती. आपण ज्या वाहनांसाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत ती गेली कुठे याची शहानिशा करण्याची साधी तसदीदेखील साठे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
धक्कादायक माहिती अशी आहे की या गाड्यांचे फॅब्रिकेशनचे काम मीरा रोड येथील ज्या मिरॅकल मोटर्सला दिले होते त्यांनी फॅब्रिकेशन पूर्ण झाल्यानंतर गाड्या महामंडळाने घेऊन जाव्यात म्हणून तगादा लावल्ला आहे. मात्र, महामंडळाने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी या गाड्या खडवली येथे नेऊन टाकल्या. या प्रकरणीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
त्यानंतर लागला गाड्यांचा ठावठिकाणा
इतक्या वर्षांनंतर महामंडळाच्या हे लक्षात आले कसे? याचा किस्साही धक्कादायक आहे. ही वाहने ज्या व्यक्तीच्या खासगी जागेवर उभी आहेत त्या व्यक्तीने इतकी वर्षे गाड्या ठेवल्याचे भाडे मागणारे पत्र महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाला दिल्यानंतर गाड्यांचा ठावठिकाणा लागला.
कारवाई होणार का?
राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात या ४१ गाड्यांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. आता नवे मंत्री सुरेश खाडे काय करतात, याबाबत उत्सुकता आहे. या गाड्या भंगारात जाईपर्यंत अधिकारी का झोपले होते? या नुकसानीची जबाबदारी कोणाची? हे खाडे निश्चित करतील काय आणि त्यांच्यावर कारवाई करतील काय असा असा ‘लोकमत’चा सवाल आहे.