कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:02 PM2020-12-26T22:02:46+5:302020-12-26T22:11:56+5:30

पुणे - नगर महामार्ग खराडी राहणार बंद , जिल्ह्याच्या सीमांवर होणार नाकाबंदी

Three-day curfew in 18 villages including Koregaon Bhima from December 30: Dr. Abhinav Deshmukh | कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख

कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे - नगर महामार्ग खराडी राहणार बंद , जिल्ह्याच्या सीमांवर होणार नाकाबंदीमोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा लगत असलेल्या पेरणे (ता. हवेली) येथिल ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. बाहेरील नागरिकांना कोरेगाव भीमा व परिसरातील अठरा गावांमध्ये येण्यास ३० डिसेंबरपासून बंदी घालण्यात आली असुन पुणे जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथिल पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद देशमुख, दौड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे उपस्थित होते.
 

पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले की,‘ विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो अनुयायी येत असतात. मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही. यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ देखील लागू केले आहे. त्यानुसार ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ सकाळपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जे मोजके व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यांना पोलीस प्रशासनाच्या पास देण्यात येणार असून ते पास लोणीकंद पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालय येथून देण्यात येणार आहेत. त्यानुसार पास असणाऱ्या मोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. 

सोशल मीडियावर चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला असून परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यांसह परिसरात फ्लेक्स बोर्ड होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे देखील यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. तर कामाला जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार असून त्यांनी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे, तसेच विजयस्तंभ परिसरातील अठरा गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून तेथील स्थानिक व्यवहार सुरु ठेवण्यात येणार असून स्थानिकांनी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधित प्रामुख्याने लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील लोणीकंद, पेरणे, तुळापुर, बकोरी, वढु खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव तसेच शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढु बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या अठरा गावांमध्ये बाहेर गावातील व्यक्तींना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र या भागातील कारखानदारी व दैनंदिन व्यवहार सुरुच राहतील. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात होणार असल्याने पेरणे विजयस्तंभ व परिसरात सभा,मंडप, खाद्य पदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रीचे स्टॉलवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तीना हॉटेल, लॉजेस इतर आस्थापनात वास्तव्यासही प्रतिबंध असेल.
          प्रतिबंधात्मक आदेशातून अत्यावश्यक वैदयकीय, अग्नीशमन, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिलेले पास धारकांनाही सवलत असेल. मानवंदनेसाठी येणारे पासधारक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची कोवीड तपासणी व मार्गदर्शक सूचनांचे पालन तसेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच आदेश मोडणा-यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
------
ग्रामीण भागातही जमावबंदीचा प्रस्ताव...
नववर्षाच्या निमित्ताने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही गर्दीची शक्यता असल्याने मावळ, मुळशी, हवेली तालुकयासह शिरुरमधील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येही दि. २५ डिसेंबर ते दि. ५ जानेवारी २०२१ दरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 
--------------------- 

अशी सुरु किंवा बंद राहणार वाहतूक...  

येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे - नगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून येथील वाहतुक ३१ डिसेबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
* चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूकही पूर्णपणे बंद असेल. तसेच अहमदनगर बाजूकडून पुणे, मुंबई बाजूकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पयार्यी मार्गे पुण्याकडे येतील.

* पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे- सोलापूर हमरस्त्याने चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

* मुंबई येथून अहमदनगर बाजूकडून जाणारी जड तसेच माल वाहतूकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने, (उदा. कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.    

Web Title: Three-day curfew in 18 villages including Koregaon Bhima from December 30: Dr. Abhinav Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.