निसर्गही कन्फ्युज! राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट, त्यातच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:32 AM2023-03-03T05:32:39+5:302023-03-03T05:33:01+5:30

उन्हाळ्यातील तीन महिन्यांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण तीन महिन्याच्या सरासरीइतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

Three days of heat wave, including rain in Maharashtra; see climate of summer march | निसर्गही कन्फ्युज! राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट, त्यातच पाऊस

निसर्गही कन्फ्युज! राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट, त्यातच पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च उजाडतानाच मुंबईसह राज्याला उन्हाचे चटके बसू लागले असून, पुढील ७२ तासांसाठी मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी ४ ते ६ मार्चदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली.

राजस्थान तसेच दक्षिण पाकिस्तानदरम्यानच्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे ४ मार्चपासून पुढील ५ दिवस मुंबई, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील पावसाच्या सरी मार्चच्या पावसाच्या सरासरीपेक्षा कमी असण्याची आणि उर्वरित जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे, असे  निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. ४, ५, ६ मार्च असे ३ दिवस महाराष्ट्रात असह्य उष्णतेची काहिली जाणवू शकते. त्यानंतर कमाल तापमानात घसरण होऊ शकते,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे मार्चच्या सरासरी इतके, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल. संपूर्ण उन्हाळ्यात पहाटेचे किमान तापमान सोलापूर, मराठवाडा, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ  जिल्ह्यात तीन महिन्यांच्या सरासरी इतके, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

मार्चपासूनच उष्णता
मार्च महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग व नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यातील तीन महिन्यांत मुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण तीन महिन्याच्या सरासरीइतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असेल.

Web Title: Three days of heat wave, including rain in Maharashtra; see climate of summer march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.