तीन दिवस मजुरी, तीन दिवस शिक्षण

By Admin | Published: July 28, 2016 05:46 PM2016-07-28T17:46:48+5:302016-07-28T17:46:48+5:30

बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले.. वडिलांच्या पश्चात आधार होता तो आईचा.. मात्र, दीड वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने आईही सोडून गेली आणि आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या दोन बहिणीचे छत्र हरवले.

Three days wages, three days education | तीन दिवस मजुरी, तीन दिवस शिक्षण

तीन दिवस मजुरी, तीन दिवस शिक्षण

googlenewsNext

इम्रान शेख
उस्मानाबाद, दि. २८ : बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले.. वडिलांच्या पश्चात आधार होता तो आईचा.. मात्र, दीड वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने आईही सोडून गेली आणि आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या दोन बहिणीचे छत्र हरवले. मात्र, त्यानंतरही त्यांनी हिम्मत हरली नाही. दहावीतील निकिता शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी तीन दिवस शाळेत तर घरखर्च चालविण्यासाठी तीन दिवस कामाला जाते. तिनेच आता धाकट्या बहिणीच्याही शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तालुक्यातील गोवर्धनवाडी परिसरातील या हिंमतवान बहिणींच्या धैर्याची ही कहाणी आहे.

आई-वडिलांच्या मायेला पोरके झाल्यानंतर निकिता अगरचंद मोटे ही ढोकी येथीलच तेरणानगर साखर कारखाना प्रशालेत दहावीच्या वर्गात शिकत आहे. मूळची बीड जिल्ह्यातील माळी चिंचोली येथील रहिवासी असलेल्या निकिताच्या वडिलांचे ती तीन वर्षांची असताना म्हणजेच बारा वर्षांपूर्वी येडशी-येरमाळा मार्गावर अपघाती निधन झाले. त्यामुळे निकिताची आई संगीता या निकिता व तिची लहान बहीण पूजा यांना घेऊन माहेरी गोवर्धनवाडी येथे आली. येथे सरपंच विनोद थोडसरे यांनी त्यांना राहण्यासाठी गावठाणची जागा त्यांच्या नावावर करून दिली.

निकिताची आई शेतात मोलमजुरी, धुणी-भांडी करून कसेबसे निकिता व पूजा यांना वाढवित होती. तोच आणखी एक काळाचा घाला या कुटुंबावर पडला.निकिताची आई संगिता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि या दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोघींचा सांभाळ कोण करणार, त्यांच्या शिक्षणाचे काय, घरखर्च कसा भागवायचा, अशा अनेक प्रश्नांचा गुंता उभा राहिला. आईच्या निधनानंतर काही दिवस या दोघी बहिणींचा नातेवाईकांनी सांभाळ केला. मात्र, दोघी शाळेत जावू लागल्या, समज येवू लागली तसे नातेवाईकांकडे तरी किती दिवस रहायचे, असा प्रश्न निकिताला पडत होता.

आणि अखेर लहान बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेत निकिताने स्वत:च्या घरी म्हणजेच गोवर्धनवाडीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. घरखर्च भागविण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस ती मजुरी करून स्वत:बरोबरच धाकट्या बहिणीच्या शिक्षणासाठी व घरखर्चासाठी पैसे कमावते. तर उरलेले तीन दिवस ती शिक्षणासाठी शाळेत जाते. विशेष म्हणजे, गोवर्धनवाडी ते शाळा हे अंतर पाच किमीचे आहे. मात्र, पायपीट करीत तिचे शिक्षण सुरू आहे. पायपीट करीत शाळेतून आल्यानंतरही दोन-तीन घरी धुणी-भांडी करून ती अगदी आई-वडिलांप्रमाणेच धाकट्या बहिणीचीही काळजी घेत आहे. म्हणूनच आठवीत असलेल्या बहिणीला तिने आजपर्यंत एकदाही कुठे कामाला पाठविलेले नाही.

रेशनकार्ड मिळेना
शासकीय योजनांचा अनेक धनाड्य गैरफायदा घेतात. मात्र, गरजूंपर्यंत योजना पोहोंचत नाहीत, हे सार्वत्रिक चित्र आहे. याचाच प्रत्यय निकिताशी चर्चा करताना पुढे आला. एवढे वर्ष प्रयत्न करूनही अद्यापपर्यंत निकिताला स्वत:चे रेशन कार्ड मिळालेले नाही. प्रशासनाने पुढाकार घेऊन या बहिणींना रेशनकार्डासह इतर शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

दोघी बहिणींना व्हायचेय अधिकारी

हसण्या-बागडण्याच्या वयात आई-वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही हिंमत न हारता मोठ्या धाडसाने निकिता आणि पूजा आयुष्यात उभ्या राहत आहेत. उदरनिर्वाहासाठी मजुरी आणि शिक्षणासाठी पायपीट या नित्याच्याच बाबी आहेत आणि तरीही मोठे होवून दाखविण्याची ऊर्जा कायम आहे. त्यामुळेच शिक्षण घेऊन आम्हाला अधिकारी व्हायचेय, असे त्या आवर्जुन सांगतात.

Web Title: Three days wages, three days education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.