जिलेटिनच्या भीषण स्फोटात तीन ठार, पाच जखमी
By admin | Published: January 10, 2015 01:41 AM2015-01-10T01:41:53+5:302015-01-10T01:41:53+5:30
माण तालुक्यात पवनचक्की उभारणीच्या कामासाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन तीनजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले.
दहिवडी (सातारा) : माण तालुक्यात पवनचक्की उभारणीच्या कामासाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन तीनजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. पवनचक्की कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस माहिती घेत आहेत.
दादासाहेब रामचंद्र जगदाळे (५0), संदीप उत्तम माने (३५), शशिकांत पांडुरंग कुलकर्णी (३५) अशी मृतांची नावे आहेत. माण तालुक्यातील बोथे येथील ‘जंगला’ नावाच्या शिवारातील डोंगरावर तीन कंपन्यांकडून पवनचक्क्या उभारणीचे काम सुरू आहे. येथे कंपन्यांनी कामगारांसाठी निवासस्थाने तसेच साहित्य ठेवण्यासाठी शेड उभारली आहेत. स्फोट झालेले जिलेटिन ‘बोथे विंड फार्मा’ कंपनीचे आहे, अशी माहिती दुर्घटनेतील जखमींनी जिल्हा रुग्णालयात दिली.
कंपनीने येथे दीडशे फूट लांबीचे गोदाम उभारले असून यामध्ये जिलेटिनचा साठा करून ठेवला होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही कामगार कामावर आले. यानंतर नऊ वाजता येथे जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरून गेला. परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, तर अनेक घरांवरील कौले फुटली.
स्फोटाच्या आवाजाने ग्रामस्थांनी डोंगराच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी आल्यानंतर त्यांना पत्रे, पवनचक्की साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यामध्ये शशिकांत कुलकर्णी जागीच ठार झाले होते. ग्रामस्थांनी ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले. स्फोटाच्या या प्रकारा नंतर पवनचक्की कंपनी व पंचक्रोशीतील जनते मध्ये भितीचे वातावण आहे. (प्रतिनिधी)
दीडशे कामगार बचावले...
या ठिकाणी दीडशेहून अधिक कामगार उत्तर प्रदेश येथील आहेत. तीनच दिवसांपूर्वी हे कामगार आपल्या गावी निघून गेल्यामुळे ते सुदैवी ठरले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याविषयी जिल्हा प्रशासनही बोलायला तयार नव्हते. मात्र, घटनास्थळावरून मिळालेली माहिती आणि स्थानिकांशी चर्चा केली असता शुक्रवारी येथे उपस्थित असणारे सुरक्षारक्षक साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावत होते. हा कचरा त्यांनी पेटवून दिला आणि त्यामुळेच हा स्फोट झाल्याची चर्चा होती.
साताऱ्याच्या बोथे (ता. माण) येथे जिलेटिनचा शुक्रवारी स्फोट झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पवनऊर्जा कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली.
दहिवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आम्ही या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, सातारा