दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे मृत्युमुखी
By admin | Published: April 26, 2017 01:50 AM2017-04-26T01:50:43+5:302017-04-26T01:50:43+5:30
दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ दाम्पत्य आणि त्यांचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना मावळ तालुक्यातील धामणे गाव येथे घडली.
तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : दरोडेखोरांच्या हल्ल्यात ज्येष्ठ दाम्पत्य आणि त्यांचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना मावळ तालुक्यातील धामणे गाव येथे घडली. मंगळवारी पहाटे ४ ला दरोडेखोरांच्या आठ जणांच्या टोळक्याने शेतातील घरात घुसून, डोक्यात टिकावाचे घाव घालून अमानुष मारहाण करीत लुटमार केली. या हल्ल्यात एक महिला आणि सहा वर्षांची बालिका जखमी झाली आहे.
सोमाटणे फाट्यापासून काही अंतरावर हे धामणे गाव आहे. तेथून १ किलोमीटर अंतरावरील शेतात फाले कुटुंबीयांचे घर आहे. दरोडेखोरांनी फाले यांच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा तोडून, तसेच मागील खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्यांच्या डोक्यात टिकावाचे घाव घातले. त्यात नथू विठोबा फ ाले (वय ६५), त्यांची पत्नी छबाबाई (६०) आणि मुलगा अत्रिनंदन उर्फ आबा (३०) हे मृत्युमुखी पडले. फाले यांची सून तेजश्री अत्रिनंदन फाले (वय २५) डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडल्या, तर सहा वर्षांची नात अंजली अत्रिनंदन फाले ही जखमी झाली. त्यानंतर, दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरचे दागिने लुटून नेले. शुद्धीवर आल्यानंतर सून तेजश्री यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर, आजूबाजूचे आणि गावातील लोक त्या ठिकाणी आले. ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, देहू रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे येथून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण मावळ खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)