पुण्यात २४ तासांत तीन मृत्यू; मराठवाड्यात पहिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:51 AM2020-04-06T05:51:49+5:302020-04-06T05:52:06+5:30
कोरोनाचा वाढता उद्रेक : पुणे जिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरीपार
पुणे : पुण्यात कोरोना विषाणूचा उद्रेक अचानक वाढला. एकाच दिवसांत २१ नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात १७ आणि पिंपरी-चिंचवडमधील चार रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. पुण्यात २४ तासांत तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
शहरात मागील ३ दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मृत्यू होणाऱ्या नागरिकांना आधीपासून काहीतरी आजार होता. नंतर कोरोनाची लागण झाली. त्यात या लोकांचा मृत्यू झाला. पुण्यात २४ तासांत तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर ६९ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिलेचाही
मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेला पित्ताशयाचा आजार होता.
६० वर्षीय महिलेवर यापूर्वी नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
स्वच्छता सेवकाचे सोशल डिस्टन्सिंग
पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयात स्वच्छतेचे काम करणारे सेवक देखील आपल्या घरी आल्यानंतर कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेत आहेत. घराबाहेरच चहा घेताना त्यांचे टिपलेले छायाचित्र.
कोरोना संशयित दोघांचा जळगावात मृत्यू
जळगाव : कोरोना झाल्याच्या संशयावरून कोरोना कक्षात दाखल असलेल्या दोन जणांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. यात ६५ वर्षीय वृद्ध महिला आणि ३३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यांना अन्य व्याधी असल्याचेही समोर आले आहे़ दोघांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने या महिलेस शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल केले होते. नमुने घेतल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला़ त्यांना मधुमेह, रक्तदाब व दमा हे विकार होते़ तर तरूणाला प्राथमिक स्तरावर न्युमोनियाची लागण झाल्याचे समोर आले होते.