विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

By admin | Published: June 14, 2017 01:51 AM2017-06-14T01:51:06+5:302017-06-14T01:51:06+5:30

सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.

Three district banks of Vidarbha will live | विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

Next

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.
या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली असून कर्जमाफी झाली अथवा सरकारने ‘पॅकेज’ दिले तरच त्या तरतील असे भाकित ‘लोकमत’ने ११ मार्च २०१७ रोजी केले होते ते आता खरे ठरले आहे. या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा राज्यातील सर्वात जुन्या नागपूर जिल्हा बँकेला होणार आहे.
नागपूर जिल्हा बँकेजवळ ३१ मार्च २०१७ रोजी ८४२ कोटींच्या ठेवी होत्या व कर्जवाटप ६६१ कोटी होते, त्यापैकी ४७८ कोटी कृषीकर्ज होते. बँकेचा संचित तोटा २१६ कोटी होता. कर्जमाफी पोटी बँकेला ४७८ कोटी मिळतील व संपूर्ण तोटा संपुष्टात येऊन बँकेजवळ २६२ कोटी अतिरिक्त निधी राहील व बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. ‘‘कर्जमाफीमुळे आम्ही संकटातून बाहेर पडून एक सक्षम बँक बनू’’ असे बँकेचे मुख्याधिकारी संजय कदम म्हणाले.
बुलडाणा जिल्हा बँकेजवळ ५१९ कोटी ठेवी होत्या व ५२२ कोटी कर्जवाटप होते त्यापैकी ३९२ कोटी कृषी कर्ज होते. बँकेचा संचित तोटा २४७ कोटी होता. त्यामुळे बँकेला ३९२ कोटी कर्जमाफीतून मिळतील व बँकेला १५५ कोटी खेळते भांडवल मिळेल. ‘‘कर्जमाफी ही आमच्या बँकेसाठी अचानक मिळालेले वरदान आहे.’’ असे मुख्याधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.
वर्धा जिल्हा बँकेची स्थिती जरा वेगळी आहे. बँकेजवळ ३६५ कोटी ठेवी आहेत व कर्जवाटप ३१८ कोटी व कृषीकर्ज २४३ कोटी आहे. बँकेचा संचित तोटा २८० कोटी आहे. त्यामुळे बँकेला २४३ कोटी मिळाले तरी ३७ कोटी तोटा कायम राहील. ‘‘सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी व सक्षम जिल्हा बँक बनवावे’’ अशी अपेक्षा मुख्याधिकारी अरुण कदम यांनी व्यक्त केली.

तक्ता (रु. कोटीत)
नावठेवीएकूण कर्जकृषी कर्जसंचित तोटा
बुलढाणा जिल्हा बँक ५१९.०९५२२.९१३९२.७८२४७.७०
वर्धा जिल्हा बँक३६५.५६३१८.६५२४३.०९२८०.८५
नागपूर जिल्हा बँक८४२.२२६६१.०४४७८.९७२१६.१०

Web Title: Three district banks of Vidarbha will live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.