शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी तीन अभियंते तडकाफडकी निलंबित
By admin | Published: May 5, 2015 01:13 AM2015-05-05T01:13:11+5:302015-05-05T01:13:11+5:30
बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी
यवतमाळ : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. यात वीज वितरणला दोषी ठरवून दंड आकारण्यात आला. या दंडाचा वचपा काढण्यासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याला वीजचोरीच्या खोट्या आरोपात अडकविले. ४० वर्षांपासून नियमित वीजबिल भरणारा वृद्ध शेतकरी व्यथित झाला आणि त्यातच त्याचा सोमवारी त्याचा मृत्यू झाला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांच्यासह उपकार्यकारी अभियंता आणि साहाय्यक अभियंत्यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.
अमरलाल मनिहार (८०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूरचे रहिवासी होते. त्यांच्या शेताला वीज पुरवठा करणारी डीपी जळाली. दुसरी डीपी बसविण्याची मागणी अमरलाल यांच्यासोबतच इतर शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी थकीत बिल भरण्याचा मुद्दा कंपनीने पुढे केला. या कालावधीत तीन महिने लोटून गेले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेवटी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर लगेच नवीन डीपी बसविण्यात आली. या प्रकरणात कंपनीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड ठोठावण्याचा वचपा म्हणून वीज चोरीचा आळ घेणे सुरू केले. अमरलाल यांच्या शेतात धाड घातली. त्यावेळी शेतात वीज मीटर लावलेले होते. तरीही कारवाई करण्यात आली. पंचनाम्यावर कंत्राटदाराने मजुरांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. नियमित वीज भरण्याचा आळ घेतल्याने मणिहार यांनी खाट धरली. (वार्ताहर)