पडझडीचे तीन बळी
By admin | Published: June 24, 2015 04:16 AM2015-06-24T04:16:48+5:302015-06-24T04:16:48+5:30
सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप
मुंबई : सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे़ याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला़ अनेक भागांत पाणी तुंबले़ पालिकेने जादा पंप लावून पाण्याचा निचरा वेळेत केला़ परंतु पावसाच्या तडाख्यामुळे संरक्षण भिंत, दरड, वृक्ष कोसळून तसेच शॉक लागून एकूण ३ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत़
गोवंडीतील सह्याद्री नगरमध्ये शिवसेना शाखेजवळ संरक्षण भिंत कोसळून बेली अशोककुमार (२५) या महिलेचा मृत्यू झाला़ मंगळवारी दुपारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ झाड कोसळून अॅथनी सॅबेस्टियन (२२) या तरुणाचा मृत्यू झाला़ अॅन्थनी हातगाडीवर डोसे विकत असे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याच अपघातात गीता खारवा (३०) ही महिला जखमी झाली. सोमवारी मध्यरात्री २च्या सुमारास विजेच्या खांबावरील बॅनर उतरवित असताना प्रकाश आसाराम राजभर या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात घडली. घरात पावसाचे पाणी झिरपू नये म्हणून त्यावर बॅनर टाकण्यास तो विजेच्या खांबावर चढून त्यावरील बॅनर उतरवित होता.