मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या; एकाने जाळून घेतले
By admin | Published: January 5, 2015 04:37 AM2015-01-05T04:37:19+5:302015-01-05T04:37:19+5:30
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात आणखी तीन शेतक-यांनी आत्महत्या केली
औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असून, नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यात आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर एकाने जाळून घेतले. अंबाजोगाईतील रूग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भंडारवाडी येथे मारोती माधव केंद्रे (३५) यांनी शनिवारी विषप्राशन करून आत्महत्या केली़ त्यांच्या नावे एक हेक्टर जमीन असून, बँकेचे ४० हजारांचे कर्ज आहे़
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी येथे भागवत कारभारी तोंडे (५०) यांनी शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना पाच एकर शेती असून, त्यांच्यावर खासगी सावकारासह सोसायटीचे कर्ज होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे अवकाळी पावसाने कांद्याचे झालेले नुकसान आणि त्याला मिळालेला कमी भाव यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले महादेव लक्ष्मण घाडगे (४५) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)