मराठवाडा, विदर्भात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 04:54 AM2016-10-24T04:54:00+5:302016-10-24T04:54:00+5:30
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात दोन तर, विदर्भात एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
हिंगोली/ नांदेड/ वर्धा : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यात दोन तर, विदर्भात एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथे बालाजी किसनराव पांडव (५५) या शेतकऱ्याने रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
तर, नांदेड जिल्ह्याच्या लिंगापूर (ता़ मुखेड) येथील नागोराव व्यंकटराव तडखेले या ६५ वर्षीय शेतकऱ्याने रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली़ त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते़ यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकासन झाले. कर्जफेडीच्या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे़
विदर्भात वर्धा जिल्ह्याच्या पवनार येथे शेतकरी चंदू नामदेव वाघमारे (४२) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे १० लाख रुपयांचे कर्ज आहे. कर्जफेडीच्या चिंतेमुळे आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)