शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:33 AM2022-07-20T06:33:08+5:302022-07-20T06:33:55+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, दीपा गवते, प्रभाग समितीचे माजी सदस्य दामोदर कोटियन, संतोष मुळे, चंद्रकांत सोनकांबळे आदींचा समावेश आहे.
शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक खैरणे येथील क्रिस्टल हाऊस कार्यालयात स्वगृही परतल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली. एक वर्षापूर्वी नवी मुंबईतील भाजपचे हे तिन्ही माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन नगरविकास व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले होते. पण आता राज्यात पुन्हा शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे त्यांनी घरवापसी केली.
घरे वाचविण्यासाठी
- दिघा विभागातील अनधिकृत बांधकामांची येथील रहिवाशांवर टांगती तलवार आहे.
- ८० ते ९० इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांची घरे तसेच नवी मुंबईत गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावीत, अशी मागणी आहे.
- गणेश नाईक यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा प्रश्न सोडवू शकतात, म्हणून आम्ही भाजपात प्रवेश केल्याची माहिती नवीन गवते यांनी दिली.