मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 03:16 AM2017-01-16T03:16:03+5:302017-01-16T03:16:03+5:30
भार्इंदर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
मीरा रोड : भार्इंदर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. एक आरोपी फरार आहे. बलात्कार व हत्या करणारा मुख्य आरोपी मुलीच्या वडिलांकडे कामाला होता. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ३० तासांत पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला, असे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे हत्येनंतरही आरोपी कुठेही पळून न जाता त्याच भागात राहत होते.
भार्इंदर पूर्वेच्या आझादनगरमध्ये राहणारी चार वर्षांची मुलगी हुमेरा महिर्बुरजा कुरेशी घराबाहेर खेळत असतानाच बेपत्ता झाल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी सायंकाळी नाल्यात मांजरमाती खणत असल्याचे पाहण्यास गेलेल्या दोघा मुलांना मातीच्या बाहेर आलेला हाताचा पंजा व पायाची बोटे दिसली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो हुमेराचा होता.
याप्रकरणी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, नवघरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रफुल्ल वाघ तपास करत होती. जे.जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या चौकशीतून त्याच भागात राहणारा मोहम्मद युनूस हाजी महमद बशीर शहा ऊर्फ झीरो ऊर्फ झीरू (२४) याला ताब्यात घेतले. चौकशीत युनूसने चॉकलेटच्या बहाण्याने हुमेराला उचलून नेले. चॉकलेट दिल्यावर तिला निर्जन नाल्याजवळ घेऊन गेला. तेथे मोहम्मद रोजान इसहाक राईनी ऊर्फ लंगडा (३८), जितेंद्र ऊर्फ जितूू तीर्थप्रसाद राव (३२) व राजेश हे आधीपासूनच होते. युनूसने तेथेच त्या चिमुरडीवर अत्याचार केला. ती मोठ्याने रडू लागल्याने युनूसने तिचे नाक व तोंड दाबले व तिच्यावर वार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याचे समजताच नाल्यातच तिचा मृतदेह पुरून टाकला.
युनूस हाती लागताच अन्य आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, रोजान व जितेंद्रला नवघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दोघांनी हुमेराचा मृतदेह पुरण्यात मदत केल्याचे कबूल केले. चौथा आरोपी राजेश मात्र पसार झाला. (प्रतिनिधी)
>युनूसचे नेहमी घरी येणे-जाणे
सर्व आरोपी आझादनगरमागील मैदानातच झोपड्यांत राहायचे. भंगार गोळा करणे, माल वाहणे अशी मिळेल ती कामे करायचे. गांजाचे व्यसन त्यांना होते. युनूसला अश्लील क्लिप पाहण्याचा छंद होता. तो हुमेराच्या वडिलांच्या टेम्पोत भंगार भरण्याचे काम करायचा. त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.