विट्यामध्ये तिघांची टोळी जेरबंद
By Admin | Published: August 2, 2015 11:11 PM2015-08-02T23:11:30+5:302015-08-03T00:12:32+5:30
या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हेचे कबूल केले पन्नासहून अधिक गुन्ह्यांचा छडा; १२ लाखांचा ऐवज जप्त
विटा : विटा पोलिसांनी दि. २२ जुलै रोजी अटक केलेल्या राजेंद्र शिवाजी बाबर, महेश शिवाजी बाबर (दोघेही रा. किकली, जि. सातारा), नानासाहेब हरिबा कदम (रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) या संशयित चोरट्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांत घरफोड्यांसह अन्य गुन्हे केल्याचे कबूल केले असून, विटा पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून विविध घरफोड्यांतील सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २७४ ग्रॅम सोने, ७ किलो चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह दोन चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. विट्यासह सांगली जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर झालेल्या चोऱ्यांमध्ये या टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.विटा पोलिसांनी गेल्या आठवड्यात महेश शिवाजी बाबर (वय ३८), राजेंद्र शिवाजी बाबर (४५) या दोन सख्ख्या भावांसह येतगावच्या नानासाहेब हरिबा कदम अशा तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यातील महेश आणि राजेंद्र बाबर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले. त्यांच्यावर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हत्यारे कायदा भंग आणि वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापैकी संशयित राजेंद्र शिवाजी बाबर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाली असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
विटा पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांकडे चौकशी केली असता, विटा शहरासह उपनगरांतील काही चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी विटा चोरीतील २७४ ग्रॅम सोने, १ किलो २८४ ग्रॅम चांदी यासह अन्य ३ लाख ८९ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संशयितांनी शहरातील हजारे मळा, सुळकाई रस्ता, मायणी रस्ता, दत्तनगर, सावरकरनगर, जुना वासुंबे रस्ता, मेटकरी वस्ती आदी भागात चोऱ्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्याही हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील संशयित महेश बाबर याच्याकडून बारा जिवंत काडतुसे, चांदीचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित राजेंद्र बाबर याच्या मायणी रस्त्यावरील घरातून चार मोबाईल, दोन कॅमेरे, मनगटी घड्याळ, चांदीच्या वस्तू असा सुमारे ८२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)
राजेंद्र बाबर टोळीचा म्होरक्या
या टोळीकडून लोखंडी कात्री, शिडी, सोने गाळण्याचे यंत्र, हातोडा, कटावणी, बॅटरी जप्त केली आहे. साडेपाच किलो चांदी जप्त केली आहे. संशयितांनी सोने व चांदी विटा व पंढरपूर येथील सराफाकडे विकल्याचे तपासात पुढे येत आहे. दहा टीव्ही संच जप्त केले आहेत. त्यांची किंमत २ लाख ७७ हजार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे, नाना पाटील, बाजीराव पाटील, विजय पारधी, विलास मुंढे, बाबूराव खरमाटे, राजेंद्र भिंगारदेवे, किरण खाडे, विशाल चंद, विक्रम गायकवाड, रामचंद्र खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.