अंत्यसंस्कारासाठी लीटरभर रॉकेलकरिता तीनशेचा दर
By admin | Published: August 30, 2016 11:04 PM2016-08-30T23:04:43+5:302016-08-30T23:04:43+5:30
सोमवारी एका अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडे येथील कर्मचाऱ्याने एका लीटर रॉकेलसाठी चक्क ३०० रुपयांची मागणी केली.
जितेंद्र कालेकर/ सुबोध कांबळे
ठाणे, दि. 30 - मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड पूर्व येथील स्टेशन रोड परिसरातील स्मशानभूमीत सुरू असून सोमवारी एका अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडे येथील कर्मचाऱ्याने एका लीटर रॉकेलसाठी चक्क ३०० रुपयांची मागणी केली. या प्रकाराने नातेवाईकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मीरा रोड येथील रहिवाशी संजय शिंदे यांचे वडील कृष्णा शिंदे (६२) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मीरा रोड स्मशानभूमीत दुपारी २ वा. च्या सुमारास पोहचली. अंत्यविधीसाठी शासकीय कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अग्निडाग देण्यासाठी त्यांचे पार्थिव काढण्यात आले त्यावेळी तेथील कर्मचारी निवृत्ती कटारनवरे याने अंत्यसंस्कारासाठी लाकडांची मांडणी करतांनाच संजय शिंदे यांच्याकडे तूप, सुंभ आणि रॉकेलसाठी पैशांची मागणी केली. त्यात रॉकेलसाठी प्रति लीटरमागे त्याने ३०० रुपयांचा दर सांगितला.
नातेवाईक आणि आप्तेष्ट सर्वच दु:खात असल्यामुळे कोणीच तिथे ‘भाव’ करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नेमका हाच फायदा या कर्मचाऱ्याने उचलल्याचे काहींनी निदर्शनास आणले. त्यावेळी अनेकांनी तिथे आरडाओरडा केल्याने तो रॉकेल आणून न देताच तिथून निसटला. ही बाब स्मशान अधिकारी शाम चौगुले यांच्या निदर्शनास संजय शिंदे यांनी आणली. त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे देत तिथून पळ काढला.
बाजारभावानुसार रॉकेलचा दर २६ रुपये लीटर असतांना ३०० रुपयांचा दर कसा काय सांगितला. याबाबतची विचारणा केल्यानंतर निवृत्तीने अंत्यविधीची तयारी अर्धवट सोडून तिथून काढता पाय घेतला. पालिका प्रशासनाने यापुढे तरी मृतांच्या नातेवाईकांना आणखी आर्थिक फटका बसणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
अशीही मदत...
याच स्मशानभूमीत दुसऱ्या शिफ्टसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने मात्र अर्धा लीटर रॉकेल बाहेरुन आणून दिले. आपण ही सेवा करतो, असे सांगत संबंधितांकडून पैसेही घेतले नाही. तर रॉकेलसाठी अडवणूक झाल्याचा प्रकार मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला कळताच त्याने पाच लीटर रॉकेल आणून दिले आणि नातेवाईकांचे सांत्वनही केले. ‘‘ दु:खद घटनेच्या ठिकाणी अशा प्रकारे अडवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल.’’
संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा भार्इंदर महापालिका.