देशी बनावटीच्या तीन पिस्टल अकोल्यात जप्त
By Admin | Published: August 31, 2014 12:26 AM2014-08-31T00:26:55+5:302014-08-31T00:27:10+5:30
अकोल्यात देशी बनावटीच्या तीन पिस्टल जप्त; म्होरक्यासह सहा आरोपी गजाआड.
अकोला: जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात परप्रांतातून देशी कट्टा, पिस्टल, काडतूस आणि तलवारींची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडील देशी बनावटीचे तीन पिस्टल जप्त करण्यात यश मिळविले. नंतर पोलिसांनी देशी कट्टा व पिस्टलची तस्करी करणार्या टोळीतील आणखी चार आरोपींना अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गत वर्षभरातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्वर फड व त्यांच्या पथकातील मनोहर मोहोड, शेख हसन यांना शुक्रवारी उशिरा रात्री जिल्हय़ात काही युवक पिस्टल, देशी कट्टय़ाची तस्करी करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवणीतील क्रांती नगर, बाश्रीटाकळीतील लोहगड आणि बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील गावांमध्ये झाडाझडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी शिवणीतील अमोल नंदकिशोर साळवे (२५) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
चौकशीदरम्यान त्याने लोहगडचा उमेश जोंधळे (२२) आणि कोळासाचा उमेश गुलाबराव सोळंके (२३) यांची नावे सांगितली. पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच दोघांना अटक केली. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन पिस्टल व काडतूसची माहिती दिली आणि त्या पिस्टल हरिहरपेठेतील राजकुमार ऊर्फ राज अरुण यादव (२५) याच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यासाठी काम करणारे टाकळी रेल्वे येथील अमोल काशीराम जामनिक (२६), सोपीनाथ नगरातील पवन एकनाथ गावंडे (२४) आणि किल्ला चौकातील राहुल श्यामकुमार शर्मा (२३) यांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी राज यादव याच्या घराची झडती घेऊन देशी बनावटीची तीन पिस्टल व दोन काडतूस जप्त केले.
*अमोल साळवे हा म्होरक्या
शिवणीत राहणारा अमोल साळवे हा शस्त्र तस्करी टोळीचा म्होरक्या आहे. त्यानेच पिस्टल विकत असल्याचे सांगत, या कामी त्याला उमेश जोंधळे व उमेश सोळंके हे मदत करतात. या तिघांनी पवन गावंडे व राहुल शर्मा याच्या मध्यस्थीने हरिहरपेठेतील राज अरुण यादव याला फक्त १0 हजार रुपयांमध्ये पिस्टल विकल्याचे पोलिसांना सांगितले.