तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान, शस्त्रसाठा जप्त
By admin | Published: June 19, 2016 05:39 PM2016-06-19T17:39:43+5:302016-06-19T17:39:43+5:30
अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात पोलीस व नक्षली यांच्यामध्ये रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकमक उडाली.
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 19 - अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात पोलीस व नक्षली यांच्यामध्ये रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकमक उडाली. या चमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह पोलिसांनी जप्त केले आहेत.
गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक व तेलंगणा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपल्ली जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबविले जात होते. दरम्यान जंगलात लपून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत तीन नक्षली ठार झाले. पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षल्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळाचा शोध घेतला असता, घटनास्थळावरून तीन नक्षल्यांचे मृतदेह, एक नग एके-४७ रायफल, एक नग एसएलआर रायफल, एक नग ३०३ रायफल जप्त केले. ठार झालेल्या नक्षल्यांकडे एके-४७, एसएलआर रायफल व ३०३ रायफलसारखे अत्याधुनिक शस्त्र आढळून आले. याचा अर्थ चकमकीत ठार झालेले नक्षलवादी हे कमांडर वा त्यापेक्षा मोठ्या दर्जाचे नक्षली असण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरू होते. मात्र वृत्त लिहिपर्यंत नक्षल्यांची ओळख पटली नाही. मागील सहा महिन्यातील पोलीस विभागाने नक्षल्यांविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.