कौटुंबिक वादातून तिघांची हत्या
By admin | Published: May 13, 2014 03:49 AM2014-05-13T03:49:24+5:302014-05-13T03:49:24+5:30
कौटुंबिक वादातून संतप्त वृद्धाने त्याची पत्नी, मुलगा व सुनेला बेदम मारहाण करून ठार केले. येथील जुन्या वस्तीत वॉर्ड क्रमांक ४मध्ये सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान हे तिहेरी हत्याकांड घडले.
गोरेगाव (भंडारा) : कौटुंबिक वादातून संतप्त वृद्धाने त्याची पत्नी, मुलगा व सुनेला बेदम मारहाण करून ठार केले. येथील जुन्या वस्तीत वॉर्ड क्रमांक ४मध्ये सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान हे तिहेरी हत्याकांड घडले. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. गावात तणावपूर्ण शांतता आहे. या हत्याकांडातील मृतांची नावे बिरनबाई पांडुरंग अगडे (५७), छन्नालाल पांडुरंग अगडे (३७) व योगेश्वरी छन्नालाल अगडे (३२, रा. गोरेगाव) अशी आहेत. आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी पांडुरंग अगडे (६२) यांना गहू विकायचे होते. मात्र त्यांची पत्नी बिरनबाई व मुलगा छन्नालाल यांचा विरोध असल्याने त्यांच्यात चार-पाच दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग पांडुरंगच्या मनात खदखदत होता व त्यातून आरोपीने सोमवारी पहाटे घरची मंडळी झोपेत असल्याची संधी साधली. आरोपीने प्रथम मुलगा छन्नालालवर लोखंडी सळाखीने वार करून त्याला जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच पत्नी बिरनबाई व सून योगेश्वरी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने त्यांनाही काठी व लोखंडी गुंडाने जबर मारहाण केली. एवढेच नव्हेतर पत्नी व सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्नही केला. आवाज ऐकून शेजारी आले असता पांडुरंग घराबाहेर पळाला. शेजार्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना घरात तिघे जखमी दिसून आले. जखमींना गोंदिया येथे नेत असताना बिरनबार्इंचा वाटेतच मृत्यू झाला. सून योगेश्वरीने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, तर मुलगा छन्नालाल याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात आले. मात्र नागपूरला घेऊन जात असताना त्यानेही वाटेतच जीव सोडला. घटनेची माहिती परिसरात पसरताच गावकरी चिडले. गावातले वातावरण भडकू नये म्हणून पोलिसांनी जादा कुमक बोलावली.