अपघातात मुंबईतील तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 05:13 AM2017-04-20T05:13:55+5:302017-04-20T05:13:55+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर
मोहोपाडा/ रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मुंबईतील कांदिवली भागात राहणारे तीन ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली एमएच ०२, एन ए-८२५ ही कार पानशिळ गावाच्या हद्दीत भाताण बोगद्याजवळ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आली असताना कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार द्रुतगती महामार्गालगतच्या झाडावर
जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की हे झाड बुंद्यासह तुटून पडले तर कारमधील दोन जागीच ठार झाले.
या अपघातात लालबी मोहीनिबन मुजावर (५५), रुक्साना शहाबुद्दीन शेख (३६) या जागीच ठार झाल्या. तर आलिया शहाबुद्दीन शेख (९) या मुलीचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला. तर कारमधील गुड्डू अकबर मुजावर (६०), सुलतान मोहमुद्दीन मुजावर (२०), हसन मोहमुद्दीन मुजावर (२०), सोहल हमीद मुजावर (७), सोमब अल्ताफ सय्यद (७) तसेच कारचालक जावेद युनुस शेलोट (३०) सर्व राहणार कांदिवली हे सहा जण जखमी झाले असून जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)