जळगावात ट्रक उलटून तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 04:23 AM2017-01-09T04:23:03+5:302017-01-09T04:23:03+5:30
भैरवनाथांचा नवस फेडण्यासाठी भाविकांना घेऊन जाणारा मिनी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात तिघे ठार
जळगाव : भैरवनाथांचा नवस फेडण्यासाठी भाविकांना घेऊन जाणारा मिनी ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात तिघे ठार, तर सुमारे ६० जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास वरखेडी- आंबेवडगाव रस्त्यावर सावखेडा बुद्रुक (पाचोरा) नजीक घडली.
पौष महिन्यात दर रविवारी ही यात्रा भरते. शेंदुर्णी येथील शालीकराम तुकाराम कोथळकर यांच्या नातवाचा नवस होता. सकाळी ९.४५ च्या सुमारास कुटुंबीय व नातेवाईकांना घेऊन ते मिनी ट्रकने निघाले होते. वरखेडी-अंबेवडगाव रस्त्यावर चालक अमोल माळी याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा ट्रक डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली शेतात उतरला याठिकाणी शेताचा बांध असल्याने या नालीत हा भरधाव ट्रक आदळला व उलटला.
रतन शिवलाल बारी (५०), कडूबा दामू लोहार (६०, दोन्ही रा. शेंदुणी, ता. जामनेर) आणि मंगला रतीलाल बारी (३५) अशी यातील मृतांची नावे आहेत. जखमींना शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव व जळगाव येथील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)