पंढरीत माघ वारीसाठी तीन लाख भाविक दाखल
By admin | Published: February 7, 2017 04:57 AM2017-02-07T04:57:31+5:302017-02-07T04:57:31+5:30
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत
प्रभू पुजारी, पंढरपूर
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी माघ एकादशीची वारी असून विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत़ मात्र श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.
सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, नाथ चौक ही ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत़ पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेत उभा राहतो. त्यामुळे चंद्रभागा तीर गजबजला असून भाविकांचा ओघ सुरूच आहे. (प्रतिनिधी)