जेजुरीत तीन लाखांवर गर्दी
By admin | Published: May 19, 2015 01:48 AM2015-05-19T01:48:39+5:302015-05-19T01:48:39+5:30
सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.
जेजुरी (जि. पुणे) : सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.
वर्षातून दोन वेळा सोमवती यात्रांना विशेष महत्त्व असते. सोमवती अमावास्येला रविवारी सकाळी ११.५९ वा. प्रारंभ झाला होता. देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हास्नान घालण्याची प्रथा आहे. पहाटे ४ वाजता उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
गडकोटातील प्रमुख मंदिराच्या प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्रीखंडोबा व म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली. निशाण, अश्व, चामरे, अबदाणी, सनई चौघडा अशा मंगलसुरात सोहळा सुरू झाला.
जेजुरी ते कऱ्हा नदी हे पाच किलोमीटरचे अंतर दोन तासांत पार करीत सकाळी आठ वाजता हा सोहळा कऱ्हाकाठी पोहोचला. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला स्नान घालण्यात आले. उत्सवमूर्तींची विधिवत पूजा व समाज आरती करण्यात आली. देवाच्या स्नानाबरोबरच उपस्थित हजारो भाविकांनी ही कऱ्हास्नान उरकले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. (प्रतिनिधी)