रेल्वेत लुटमारी करणारे तिघे अटकेत
By admin | Published: September 18, 2016 01:49 AM2016-09-18T01:49:36+5:302016-09-18T01:49:36+5:30
रात्रीच्या वेळी रेल्वेत लुटमारी करणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : रात्रीच्या वेळी रेल्वेत लुटमारी करणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही नेरुळचे राहणारे असून रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याची संधी साधत ते हा प्रकार करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रवाशाला लुटल्यानंतर चालत्या रेल्वेतून खाली फेकून दिले होते.
ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर प्रवाशांना लुटीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. रात्री वेळी रेल्वे स्थानक आवारात तसेच रेल्वेत एकट्या प्रवाशाला मारहाण करुन लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. २० आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गिरीधारी मसंता (४५) यांना लुटून चालत्या रेल्वेतून खाली फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी तपास सुरु असतानाच ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी नेरुळ स्थानकालगत एका पादचाऱ्याला काहीजण लुटत होते. चाकूचा वार करुन ही टोळी प्रवाशाला लुटून पळण्याच्या प्रयत्नात होती. तेवढ्यात काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार एक जण पोलीसांच्या हाती लागला होता. अधिक चौकशीत त्याच्या इतर दोघा सहकाऱ्यांची माहिती मिळताच त्यांना हिंगोली येथून पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे मसंता यांची सोन्याची चैन व अंगठी आढळून आली. तसेच त्यांनी मसंता यांना लुटून रेल्वेतून फेकून दिल्याची कबुली देखील दिली. तिघेही नेरुळचे राहणारे असून स्थानकाबाहेर संध्याकाळी भाजी विक्रीचे काम करायचे. यानिमित्ताने स्थानकात ये-जा करताना काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती त्यांनी मिळवली होती. त्यानुसार नेरुळ स्थानकातून रेल्वेने प्रवास करताना एकट्या प्रवाशा गाठून ते लुटायचे. (प्रतिनिधी)