मुंबईत १२ तासांत तीन हत्याकांड
By Admin | Published: March 14, 2017 07:43 AM2017-03-14T07:43:49+5:302017-03-14T07:43:49+5:30
होळीच्या १२ तासांत मालाड, पवई आणि धारावी अशा तीन ठिकाणी हत्या झाल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. धारावीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
मुंबई : होळीच्या १२ तासांत मालाड, पवई आणि धारावी अशा तीन ठिकाणी हत्या झाल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. धारावीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मालाड, मालवणी परिसरात बिरू बन्सल (२०) हा तरुण राहायचा. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास होळी साजरी करून तो येथील ‘महाकाली हॉटेल’ परिसरात बसला होता. त्याच दरम्यान व्यंकटेश दुराई कन्नू (३०) याच्यासोबत त्याचा मोबाइल चार्ज करण्यावरून वाद झाला. याच वादात कन्नूने भाजी कापण्याच्या चाकूने त्याच्या छातीवर वार केले. अन्य मित्रांनी त्याला अडविले.
मात्र घाव खोलवर असल्याने बन्सलला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच
त्याचा मत्यू झाला. या प्रकरणी
मालवणी पोलिसांनी कन्नूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला बन्सलच्या हत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.
पवईतील सचिन हेमांडी (२०) या तरुणाने दारूच्या नशेत आरोपी तरुणाच्या बहिणीचा मोबाइल क्रमांक मागितला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. या घटनांचा तपास सुरू असतानाच धारावी येथील संगम गल्ली परिसरात गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. (प्रतिनिधी)