तीन वैद्यकीय अधिकारी गजाआड
By admin | Published: June 11, 2014 01:17 AM2014-06-11T01:17:22+5:302014-06-11T01:17:22+5:30
वैद्यकीय भरारी पथकात भाड्याने असलेल्या वाहनांची देयके काढण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तालुक्यातील बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
धारणी तालुक्यातील घटना : देयक काढण्यासाठी मागितली लाच
धारणी : वैद्यकीय भरारी पथकात भाड्याने असलेल्या वाहनांची देयके काढण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तालुक्यातील बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये आबीद मेहमुद माहुल शेख, सुरेंद्रगिर रामगिर गिरी व किशोर बी. राजपूत या तिघांचा समावेश आहे. धारणी तालुक्यात बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत भरारी पथकासाठी दोन वाहने भाड्याने घेण्यात आली होती. या वाहनांचे देयक मंजुरीसाठी या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन मालकाला प्रत्येकी १५०० रुपयांची मागणी केली होती. लाच मागितल्याचा संवाद वाहन मालकाने आपल्या मोबाईलमध्ये टेपींग केला होता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याच्या संभाषणाची रेकॉर्र्डिंग संबधित वाहन चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
या विभागाने मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे सोमवारी सायंकाळी बिजुधावडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आबीद मेहमुद, सुरेंद्र गिरी व किशोर राजपूत या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत अटक केली. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)