तीन मंत्र्यांचे स्टिंग उघड करणार !
By admin | Published: June 26, 2015 02:38 AM2015-06-26T02:38:57+5:302015-06-26T02:38:57+5:30
राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांचे आम्ही स्टिंग आॅपरेशन केले असून ते पावसाळी अधिवेशनात उघड करणार आहोत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
अहमदनगर/मुंबई : राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांचे आम्ही स्टिंग आॅपरेशन केले असून ते पावसाळी अधिवेशनात उघड करणार आहोत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी नगरमध्ये केला. तर महिला बालकल्याण विभागातील २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणात मुख्यमंत्री राज्याची दिशाभूल करत असून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाला आता कुठे सुरूवात झाली तर घोटाळ्यांची मालिका उघड होत आहे. राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराचे स्टिंग करण्यात आले आहे. अधिवेशनात ते उघड करण्यात येईल. मात्र संबंधित मंत्री कोण, स्टिंग कधी केले, यावर बोलण्यास नकार दिला.
काँग्रेसने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये १ एप्रिल २०१५ पासून १ कोटीहून अधिक रक्कमेची खरेदी दरपत्रकाप्रमाणे करता येणार नसल्याचे म्हटले आहे. परंतु याच सरकारने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी ३ लाख रूपयांहून अधिकची खरेदी केवळ ई-निविदेच्या माध्यमातूनच करण्याचे निश्चित केले होते. १८ डिसेंबर २०१४च्या आदेशातही ३ लाखांहून अधिकची खरेदी ई-निविदेतूनच करण्याच्या निर्णयाचा पुनरूच्चार केला आहे. (विशेष प्रतिनिधी)