तीन महिने होरपळीचे! रात्रीचे तापमानही वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:47 AM2018-04-04T04:47:36+5:302018-04-04T04:47:36+5:30
देशातील सर्व उपखंडात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात तापमान सरासरीच्या तुलनेत किमान १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम भारतात या तीन महिन्यातील कमाल तापमानात किमान ०़५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे - देशातील सर्व उपखंडात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात तापमान सरासरीच्या तुलनेत किमान १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम भारतात या तीन महिन्यातील कमाल तापमानात किमान ०़५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील उष्ण कटिबंधीय मौसम विज्ञान संस्थेने २०१२ मध्ये ‘मॉन्सून मिशन क्लॉमेट फोरकास्ट सिस्टिम’ विकसित केली असून त्याचा उपयोग करुन दीर्घ काळासाठीचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ मार्च २०१८ मधील ४१ घटकांचा अभ्यास करुन एप्रिल, मे आणि जून २०१८ या तीन महिन्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़
या अंदाजानुसार जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली तसेच हिमाचल प्रदेश या हवामान उपखंडात सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमान १ अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे़ उत्तराखंड, पश्मिच उत्तर प्रदेश आणि पूर्व व पश्चिम राजस्थानमधील कमाल तापमानात ०़५ ते १ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे़
उत्तर भारताबरोबरच बिहार, झारखंड, पूर्व व पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात येथील रात्रीचे किमान तापमान ०़५ ते १ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे़
प्रशांत महासागरात ‘ला निना’
भारतीय मान्सूनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानाची स्थिती यंदा अनुकुल दिसत आहे़ प्रशांत महासागरात समुद्राच्या पाण्याच्या स्थितीवरुन ‘ला निना’ची उपस्थिती दिसून येत आहे़ जगभरातील काही हवामान केंद्रांच्या अंदाजानुसार वसंत ऋतुनंतर ‘ला निना’ ची स्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे़
जळगाव @ ४२.६ अंश सेल्सिअस
राज्यात मंगळवारी सर्वाधिक ४२़६ अंश सेल्सिअस तापमान जळगाव येथे नोंदले गेले.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस):
पुणे ३८़२, जळगाव ४२़६, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४१़६, नाशिक ३९़२, सांगली ३७़७, सातारा ३८़२, सोलापूर ४०़४, मुंबई ३२़४, सातांक्रुझ ३२़१, अलिबाग ३२, रत्नागिरी ३२़६, पणजी ३२़७, डहाणू ३२़६, औरंगाबाद ३९़८, परभणी ४१़५, नांदेड ४०़५, अकोला ४२़२, अमरावती ४०़८, बुलढाणा ३९, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४१, गोंदिया ३९़५, नागपूर ४०़७, वाशिम ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४०़८़