तंत्रज्ञान कंपनीतर्फे तीन महिन्यांची पितृत्व रजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:14 AM2017-07-18T01:14:12+5:302017-07-18T01:14:12+5:30
प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती देण्याची तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. सेल्सफोर्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीने प्रथमच
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती देण्याची तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. सेल्सफोर्स या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीने प्रथमच पालक बनणाऱ्या आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना चक्क तीन महिन्यांची पगारी पितृत्व रजा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सर्वांत मोठी पितृत्व रजा ठरली आहे. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने ६ आठवड्यांची पितृत्व रजा घोषित केली होती.
बाळाचा सांभाळ करण्यासाठी आईशिवाय कुटुंबातील इतर नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रजेला ‘सेकंडरी केअरगिव्हर लिव्ह’ अर्थात ‘दुय्यम देखभाल रजा’ असे म्हटले जाते. बाळाच्या पित्याला देण्यात येणारी रजाही याच श्रेणीत येते. या वर्षाच्या सुरुवातीस क्युमिन्स इंडियाने पितृत्व रजेचा कालावधी वाढवून एक महिना केला होता. वस्तू उत्पादन क्षेत्रात देण्यात येणारी ही सर्वांत मोठी पितृत्व रजा ठरली होती.
बहुतांश अन्य कंपन्यांत पितृत्व रजेचा कालावधी १0 दिवस ते २ आठवडे या दरम्यान आहे. औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, १२ आठवड्यांच्या पितृत्व रजेमुळे प्रतिभावान कर्मचारी भरतीसाठी कंपनीला फायदा होईल. सेल्सफोर्सचे एक संचालक ज्ञानेश कुमार म्हणाले, कर्मचाऱ्यांसाठी पगारी पितृत्व रजा हा चांगला पर्याय आहे, असा आमचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागविण्याचाही हा एक चांगला पर्याय असल्याचे आम्ही मानतो.
संघर्ष टळेल : ज्ञानेश कुमार
ज्ञानेशकुमार यांनी म्हटले की, बाळाच्या जन्मानंतर पालकांना बाळाजवळ असणे गरजेचे असते. तसेच पैशांचीही गरज असते, अशा काळात बिनपगारी रजा घेणे हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. बाळाच्या जन्मानंतर माता आणि पिता अशा दोघांसाठीही नोकरी आणि जगणे यात संघर्षाचा क्षण येतो. पगारी रजा मिळाल्यामुळे हा संघर्ष टाळता येतो. भारतासारख्या देशात तर पितृत्व रजेबाबत बोलणे अधिक गरजेचे आहे. कारण बाळाची जबाबदारी मातेचीच आहे, असा समज येथे आहे. त्याला धक्का देणे आवश्यक आहे.