साहित्य संमेलनाचं उद्घाटक कोण? 'ही' तीन नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:40 PM2019-01-08T17:40:40+5:302019-01-08T17:45:50+5:30
नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर नव्या उद्घाटकाचा शोध सुरू
यवतमाळ: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलमाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांनं दिलेलं निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर मोठा वाद झाला. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी महामंडळाकडून नव्या साहित्यिकाचा शोध सुरू झाला आहे. आज रात्रीपर्यंत संमेलनाच्या उद्घाटकाचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन प्रमुख नावं चर्चेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, प्रसिद्ध साहित्यिक आणि लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, कवी विठ्ठल वाघ यांच्या नावांचा विचार महामंडळाकडून करण्यात येत आहे. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाचे आयोजक व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर टीकेची झोड उठली आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी उद्घाटक म्हणून नवे नाव पुढे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नव्या उद्घाटकांचं नाव निश्चित करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा खल सुरु आहे. दरम्यान यवतमाळच्या आयोजन समितीनं चार ते पाच साहित्यिकांची नावं महामंडळाला सुचवली आहेत. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी ज्या नावाला मंजुरी देतील ते नाव सायंकाळी जाहीर करू, असं स्थानिक आयोजकांनी सांगितलं.