Naxalites Encounter : 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी चकमकीत ठार; पोलिसांच्या C60 दलाला मिळाले मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 11:47 AM2023-05-01T11:47:46+5:302023-05-01T11:48:20+5:30
Naxalites Encounter : अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.
महाराष्ट्र (Maharashtra) दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना मोठे यश मिळाले. गडचिरोली येथे चकमकीत 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी (Naxali) ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.
अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 38 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना ठार मारल्याच्या घटनेवर भाष्य केले. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाने गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले आणि या त्यांच्या धाडसी पावलाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचे C60 जवान आणि फोर्स सातत्याने मोठे शौर्य दाखवत आहेत. आपण गडचिरोलीचा विकास करु शकतो. आज मी तिकडे जात आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी तिथे कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Nagpur | C60 force of Maharashtra Police has killed three Naxal supporters in Gadchiroli in an encounter and I thank them for this step: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/u2hl78J4bD
— ANI (@ANI) May 1, 2023
गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की नक्षलवाद्यांचे पेरिमिली आणि अहेरी दलमचे सदस्य माने राजाराम आणि पेरिमिली सशस्त्र चौकी दरम्यानच्या जंगलात तळ ठोकून आहेत. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांच्या C-60 दलाच्या दोन तुकड्या जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आल्या.
पोलिसांच्या पथकाने दिले प्रत्युत्तर
एसपी म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी आमच्या टीमवर गोळीबार केला, ज्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीनही नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. यासोबतच शस्त्रे आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात मृतांपैकी एकाची ओळख पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी आहे. तर पेरिमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत अशी आणखी दोघांची नावे आहेत.