तीन नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार
By admin | Published: April 16, 2016 02:36 AM2016-04-16T02:36:00+5:302016-04-16T02:36:00+5:30
वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम दर्जाचे डॉक्टर तयार व्हावेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांनाही चांगले वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वातून वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपन्यांबरोबर खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांप्रमाणे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
परेल येथील वाडिया रुग्णालयाने ९० वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तावडे बोलत होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव हेदेखील या वेळी उपस्थिती होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत सरकारी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क आकारल्यास सामान्य घरातील मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. सामान्य कुटुंबातून डॉक्टर निर्माण होण्याची गरज आहे. मुंबईला काही तरी द्यावे, या भावनेतून या महाविद्यालयांची संकल्पना समोर आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक जागा निर्माण व्हाव्यात, चांगले शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी टाटा, अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यावसायिकांनी येऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही महाविद्यालये सरकारी नियमानुसार चालावीत. तसेच शुल्क पद्धती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे असावी, अशी अपेक्षाही तावडे यांनी व्यक्त केली.
वाडिया कुटुंबीयांनी गरिबांच्या सेवेसाठी रुग्णालय बांधले होते. आणि त्याचा विस्तारही झाला आहे. वाडिया कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने रुग्णांची सेवा केली, तशीच पुढेही करणार असल्याचे नस्ली वाडिया यांनी म्हटले. (प्रतिनिधी)
कुठे उभारणार वैद्यकीय महाविद्यालये?
या कंपन्या वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी उत्सुक आहेत. बीपीटीच्या वडाळा येथील रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहे. तर ‘ओएनजीसी’ने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली असून जेएनपीटी रायगड किंवा उरण या भागात ते वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहेत.
‘आवडीच्या रुग्णालयात प्रसूती अधिकार मिळावा’
महिलेच्या आयुष्यात गर्भधारणा आणि प्रसूती या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना असतात. प्रत्येक महिलेला तिच्या आवडीच्या रुग्णालयात प्रसूतीचा अधिकार मिळाला पाहिजे. यासंदर्भात सरकारने कायदा करावा, तो कायदा मी तत्काळ संमत करेन. असा अधिकार देणारा भारत हा जगातील पहिला देश असेल, अशा शब्दांत राज्यपाल विद्यासागर राव यांनी इच्छा बोलून दाखविली. महिलाकेंद्री आरोग्य व्यवस्थेची अत्यंत आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.