दादर स्थानकात होणार तीन नवीन प्लॅटफॉर्म!
By admin | Published: September 29, 2016 02:34 AM2016-09-29T02:34:59+5:302016-09-29T02:34:59+5:30
मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कुर्ला अशा पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पात परेल टर्मिनस बांधले जाणार आहे. हे टर्मिनस बांधले जात असतानाच, या प्रकल्पात आता दादर स्थानकाचाही
- सुशांत मोरे, मुंबई
मध्य रेल्वेवरील सीएसटी ते कुर्ला अशा पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पात परेल टर्मिनस बांधले जाणार आहे. हे टर्मिनस बांधले जात असतानाच, या प्रकल्पात आता दादर स्थानकाचाही कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आणखी तीन नवे प्लॅटफॉर्म दादर स्थानकात बांधले जाणार असून, त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या संख्येत वाढ होईल. हे प्लॅटफॉर्म बांधतानाच या स्थानकातील प्लॅटफॉर्मची संख्या एकूण अकरावरही जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सीएसटी ते कुर्ला अशी पाचवी-सहावी मार्गिका तयार केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून लोकल सोडण्यात येतील. त्यामुळे दादर स्थानकातील भार आणखी कमी होण्यास मदत मिळेल. पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम करतानाच, काही स्थानकांत बदलही केले जाणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवरील सर्वात व्यस्त अशा दादर स्थानकाचाही समावेश आहे. पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी करून देतानाच, आणखी तीन नवे प्लॅटफॉर्म बांधले जातील, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मध्य रेल्वेचे दादर आणि परळच्या दरम्यान पश्चिम दिशेला रेल्वेची मोकळी जागा असून, पाचवी-सहावी मार्गिका त्याच दिशेने होणार आहे. त्यामुळे सध्याच्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ हा आणखी पश्चिम दिशेला सरकवला जाईल.
कशा असतील मार्गिका
- प्लॅटफॉर्म क्रमांक १च्या बाजूला कल्याणच्या दिशेने जाणारी धिमी मार्गिका असून, त्याच्या पश्चिम दिशेला आणखी दोन नवीन प्लॅटफॉर्म बांधले जातील. असे तीन नवे प्लॅटफॉर्म दादर स्थानकात अस्तित्वात येतील. यामुळे धिम्या, जलद व मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांसाठी जादा मार्गिका उपलब्ध होतील.येथून आणखी काही लोकल सोडण्याचे नियोजनही केले जाईल.
- पश्चिम दिशेला दोन नव्या
मार्गिका असतील.त्याच्या बाजूला असणारी मार्गिका ही सीएसटी दिशेला जाणारी मार्गिका असेल.
- त्याच्या बाजूलाच असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३च्या दिशेची मार्गिका म्हणजेच सध्याची कल्याणकडे जाणारी धिम्या लोकलची मार्गिका लूप लाइन असेल. या मार्गिकेवरून दादर लोकल सोडता येईल.
- सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक
२च्या बाजूची मार्गिका डाउन जलद मार्गिका असेल.
- सध्याच्या प्लॅटफॉर्म ३ वर सीएसटीकडे जाणाऱ्या जलद लोकल थांबतील.
- सध्याच्या प्लॅटफॉर्म ४ वरून जलद दादर लोकल सोडण्यात येईल.
- सध्याचे ५ आणि ६ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म हे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ म्हणून ओळखले जातील.
सीएसटी स्थानकावरील
ताण होणार कमी
मेल-एक्स्प्रेससाठी पर्याय म्हणून दादर स्थानकात पाच, सहा, सात व आठ नंबर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यातील ५ आणि ६ नंबर प्लॅटफॉर्म हा लोकल गाड्यांसाठीही उपलब्ध असतो. त्यामुळे एकच गोंधळ उडतो. नवीन प्लॅटफॉर्म झाल्यास, दादर स्थानकातच मेल-एक्स्प्रेसचा शेवट करून त्या देखभाल-दुरुस्तीसाठी वाडीबंदर येथे नेणे शक्य होईल. त्याचप्रमाणे, दादरमधूनही काही मेल-एक्स्प्रेस ट्रेन शक्य होऊ शकते, असे सांगण्यात आले. नवीन प्लॅटफॉर्ममुळे उपनगरीय लोकल सेवांमध्येही वाढ करता येईल. दादर स्थानकातून जलद लोकलबरोबरच आणखी काही धिम्या लोकल सोडण्याचे नियोजन केले, तर सीएसटीवरील लोकलचा भारही कमी होईल.