एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग
By admin | Published: March 1, 2017 02:45 AM2017-03-01T02:45:42+5:302017-03-01T02:45:42+5:30
प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन उपक्रमाने एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : विविध प्रवासी संघटना आणि प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन उपक्रमाने एनएमएमटीचे तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ मार्चपासून हे नवीन मार्ग कार्यान्वित होणार आहेत. हे तिन्ही मार्ग सर्वसाधारण बसेसचे असणार आहेत. यातील एक मार्ग नेरूळ बसस्थानक ते मुलुंड मार्गे घाटकोपरपर्यंतचा आहे. तर उर्वरित दोन मार्ग नवी मुंबई शहरांतर्गत वसाहतींना जोडणारे आहेत.
मागील दोन-अडीच वर्षांत एनएमएमटीच्या कारभारात आमूलाग्र बदल घडले आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: एनएमएमटीच्या वातानुकूलीत बसेसना अधिक पसंती मिळताना दिसत आहे. असे असले तरी आणखी काही मार्गांवर बसेस सुरू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर परिवहन व्यवस्थापनाने बुधवारपासून तीन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मार्ग क्रमांक ५ ही बस कोपरखैरणे रेल्वे स्थानक ते वाशी स्थानकादरम्यान धावणार आहे. ही बस कोपरखैरणे सेक्टर ११ मार्गे पाम सोसायटी, कलश उद्यान, बोनकोडे गाव, कोपरी नाका येथून वाशी बस डेपोतून वाशी स्थानकाकडे जाणार आहे. तर मार्ग क्रमांक २८ ही बस घणसोली आगार ते नेरूळ बस स्थानक या दरम्यान असणार आहे. या मार्गाची बस घणसोली घरोंदा, कोपरखरेणे बस डेपो, कोपरी नाका, एपीएमसी, सानपाडा रेल्वे स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ते नेरूळ बस स्थानक यादरम्यान असणार आहे. तिसरा मार्ग क्रमांक १११ ही बस नेरूळ बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, मुलुंड मार्गे घाटकोपर असा आहे. ३४.३ कि.मी. लांबीचा हा मार्ग नवी मुंबई व मुंबईतील अनेक उपनगरांना जोडला जाणार आहे.
>मार्ग क्रमांक ५
कोपरखैरणे स्थानकातून पहिली बस सकाळी ७ वाजता, तर शेवटची बस ९.५0 मिनिटांनी असेल.
वाशी स्थानकातून पहिली बस सकाळी ७.२५ मिनिटांनी, तर शेवटची बस १0.१४ मिनिटांनी असेल.
मार्ग क्रमांक २८:
घणसोली आगारातून पहिली बस सकाळी ६ वाजता, तर शेवटची बस ८.0५ मिनिटांनी असेल.
मार्ग क्रमांक १११ :
नेरूळ बस स्थानकातून पहिली बस सकाळी ६.५५ मिनिटांनी, तर शेवटची बस ९.00 वाजता असेल.