राज्यात होणार तीन नवी अभयारण्ये, राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:36 AM2022-06-07T06:36:11+5:302022-06-07T06:37:14+5:30
औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई : राज्यात एकूण ६९२.७४ चौरस किलोमीटर क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली, तसेच औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. विनायक राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ, तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार व्हावा, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे.
हे आहेत १२ संवर्धन राखीव क्षेत्र
धुळे जिल्ह्यातील चिवटीबावरी (६६.०४ चौरस किलोमीटर), अलालदारी (१००.५६ चौ.किमी). नाशिक जिल्ह्यातील कळवण (८४.१२ चौ. किमी), मुरागड (४२.८७ चौ.किमी). त्र्यंबकेश्वर (९६.९७ चौ.किमी). इगतपुरी (८८.४९९ चौ.किमी). रायगड जिल्ह्यातील रायगड (४७.६२ चौ.किमी). रोहा (२७.३० चौ.किमी). पुणे जिल्ह्यातील भोर (२८.४४ चौ.किमी). सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (१.०७ चौ.किमी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (५.३४ चौ.किमी). नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (१०३.९२ चौ.किमी).
नवीन ३ अभयारण्य
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र, कोलामार्का व विस्तारित लोणार.
१० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित
मयूरेश्वर - सुपे (५.१४५ चौ.किमी), बोर (६१.६४), नवीर बोर (६०.६९), विस्तारित बोर (१६.३१), नरनाळा (१२.३५), लोणार वन्यजीव अभयारण्य (३.६५), गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८ चौ.किमी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (२२.३७), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (२९.९०), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (२.१७)
दोडा मार्गातील वन हत्तींच्या समस्येवर तोडगा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्ग येथील वन्य हत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यांत अभ्यास करण्याचे, तसेच हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत चर्चा झाली.
जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मान्यता
जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवर्जून निर्देश दिले, तसेच या योजनेच्या जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात उद्भव विहीर व पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी तत्काळ मान्यता मिळावी यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी, असेही सांगितले.