राज्यात ‘बी.ए.4’ चे तीन, तर ‘बी.ए.5’ व्हेरिएंटचा एक रुग्ण; गृह विलगीकरणात झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:20 AM2022-06-14T05:20:28+5:302022-06-14T05:20:45+5:30
कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे.
मुंबई :
कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी. ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे या कालावधीतील असून त्यातील दोन ११ वर्षांच्या मुली, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण गृह विलगीकरणात बरे झाले असून या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही, हा मोठा दिलासा आहे. आजही रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्राॅन कुटुंबातील विषाणू आहेत. त्यामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडील तिसरी लाट ही ओमायक्रोनमुळेच आलेली होती. मात्र, तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे आणि अतिजोखमीच्या आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
का वाढ झाली?
- कोरोनाची साथ आता एन्डॅमिक झाली आहे. याचा अर्थ अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहतील.
- सध्या आढळणाऱ्या रुग्णांना सौम्य संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.
काय काळजी घ्यावी?
- नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये
- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा
- राज्यात मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा
- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे
- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये
राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्ण
राज्यात सोमवारी १८८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,४७,१११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात १७,४८० रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ८,१३,४६,२०४ नमुन्यांपैकी ०९.७३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१२,४६२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८७१ इतका आहे. दिवसभरात नोंद झालेल्या मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.