तिघांनाही फाशीच

By admin | Published: May 10, 2017 03:03 AM2017-05-10T03:03:36+5:302017-05-10T03:03:36+5:30

संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश

The three people are hanged | तिघांनाही फाशीच

तिघांनाही फाशीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा भयानक प्रकार ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ असल्याने फाशीची शिक्षा दिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नयना अभिजित पुजारी (वय २८) या खराडी येथील सेनिक्रॉन प्रा.लि. या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामास होत्या. त्या ७ आॅक्टोबर २००९ रोजी रात्री आठच्या सुमारास कात्रज येथे घरी जाण्यासाठी खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळच्या बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी इंडिका कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी नयना यांना हडपसर येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले. त्यानंतर नयना यांना वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेऊन सामूहिक बलात्कार करत खून केला. या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६ आॅक्टोबर २००९ रोजी अटक केली.
सुनावणीदरम्यान राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी एकूण ३७ साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी.ए. आलुर यांनी १३ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांकडून न्यायालयात अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आणि न्यायालयास असलेल्या शंकांचेही दोन्ही पक्षांनी निरसन केले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्यातील मास्टर माइंड समजला जाणारा योगेश राऊत हा ससून रुग्णालयात दाखल असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता. त्याला तब्बल पावणेदोन वर्षांनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने पुन्हा पकडले होते.
योगेश अशोक राऊत (वय ३२, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (३१, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (३४, रा. दिघीगाव. मूळ भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजेश पांडूरंग चौधरी (वय ३१, रा.
गोळेगाव, ता. खेड) असे मुक्तता केलेल्या माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, खून, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली तिघांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Web Title: The three people are hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.