सीवूडमधील एटीएम मशीन फोडणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 03:08 AM2016-10-19T03:08:25+5:302016-10-19T03:08:25+5:30
बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून ते नेरुळचे राहणारे आहेत. त्यांनी सीवूड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता.
सीवूड सेक्टर ४४ येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून त्यांनी हा प्रयत्न केलेला. परंतु मशीन फोडून त्यामधील रक्कम पळवल्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान तिघे ज्या रिक्षातून आले होते, त्या रिक्षाचा नंबर सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मिळाला. रिक्षाचा शोध घेत असताना तिघेही पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये एक अल्पवयीन असून त्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी परिसरात यापूर्वी देखील असे प्रयत्न केल्याची शक्यता आहे. त्याशिवाय इतर काही गुन्हे त्यांनी केले आहेत का याचाही अधिक तपास एनआरआय पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)