वाघाच्या शिकारप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्करासह तिघांना कारावास
By Admin | Published: August 12, 2016 09:37 PM2016-08-12T21:37:08+5:302016-08-12T21:37:08+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मौजे खिरकुंड येथे वाघाची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 12 - आकोटमधल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मौजे खिरकुंड येथे वाघाची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर शिक्षा १२ आॅगस्ट रोजी आकोट न्यायालयाने सुनावली. शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय तस्कर रणजितसिंग भाटीया याचा समावेश आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आकोट वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या मौजे खिरकुंड येथे ६ आॅगस्ट २०१३ मध्ये वाघाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी आरकास, रणजीतसिंग भाटीया, ममरु व मीनारबाई यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९, आर/डब्ल्यू ५१ ए व भादंविच्या २०१ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. उपरोक्त चारही आरोपींना अटक सुध्दा करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी ममरु याने आपल्या बयानात आरकास याने वाघाची शिकार केली व अवयय नष्ट केल्याची कबुली दिली होती. तसेच आरोपी रणजीतसिंग याने सदर वाघाची चामडी ६ लाख ५० हजारांत विकत घेतली होती. रणजीतसिंग याच्याकडे वाघाची हाडेसुद्धा मिळून आली.
न्यायालयाच्या आदेशाने सदर हाडे वन्यजीव संस्था डेहरादून येथे तपासणीकरिता पाठविण्यात आली होती, त्यांनी दिलेल्या अहवालानूसार खात्री झाली. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक ए.आर.शेख, वनरक्षक जी.व्ही.उमक, आर.के. अंभारे यांच्या साक्षीपुराव्यानंतर तसेच विविध न्यायालयाच्या निकालाच्या दाखल्यांच्या आधारावर आरोपी दोषी आढळलेत. त्यावरुन आकोट न्यायालयाचे प्रथमश्रेणी न्यायाधिश नि.रा.वानखडे यांनी आरोपी आरकास याला तीन वर्ष सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड, रणजीतसिंग भाटीया यास तीन वर्ष सश्रम कारावास १० हजार रुपये दंड व ममरु याला तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागेल. तर आरोपी मिराबाई हिला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.