वाघाच्या शिकारप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्करासह तिघांना कारावास

By Admin | Published: August 13, 2016 12:44 AM2016-08-13T00:44:09+5:302016-08-13T00:44:09+5:30

आकोट न्यायालयाचा निकाल; मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत खिरकुंड येथे वाघाची शिकार प्रकरण.

Three people imprisoned with international trafficking in Tiger | वाघाच्या शिकारप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्करासह तिघांना कारावास

वाघाच्या शिकारप्रकरणी आंतरराष्ट्रीय तस्करासह तिघांना कारावास

googlenewsNext

आकोट (जि. अकोला), दि. १२ : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत खिरकुंड येथे वाघाची शिकार केल्याप्रकरणी आकोट न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी तीन आरोपींना दोषी ठरवित तीन वर्षांंचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्कर रणजितसिंग भाटिया यांचा समावेश आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आकोट वन्य जीव विभागांतर्गत येत असलेल्या खिरकुंड येथे ६ ऑगस्ट २0१३ मध्ये वाघाची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी आरकास, रणजितसिंग भाटिया, ममरू व मीनारबाई यांच्या विरोधात वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९, सोबतच ५१ ए व भादंविच्या २0१ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. उपरोक्त चारही आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी ममरू याने दिलेल्या बयाणात आरकास याने वाघाची शिकार केली व अवयव नष्ट केल्याची कबुली दिली होती. तसेच आरोपी रणजितसिंग भाटिया याने सदर वाघाची चामडी ६ लाख ५0 हजार रुपयांत विकत घेतली होती. रणजितसिंग याच्याकडे वाघाची हाडेसुद्धा सापडली. न्यायालयाच्या आदेशाने सदर हाडे वन्य जीव संस्था डेहराडून येथे तपासणीकरिता पाठविण्यात आली होती, त्यांनी दिलेल्या अहवालात ती हाडे वाघाचीच असल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी तत्कालीन सहायक वनसंरक्षक ए.आर. शेख, वनरक्षक जी.व्ही. उमक, आर.के. अंभारे यांच्या साक्षीपुराव्यानंतर तसेच विविध न्यायालयांच्या निकालाच्या दाखल्यांच्या आधारावर आरोपी दोषी आढळलेत.
आकोट न्यायालयाचे प्रथमश्रेणी न्यायाधीश नि.रा. वानखडे यांनी आरोपी आरकास याला तीन वर्ष सश्रम कारावास व २२ हजार रुपये दंड, रणजितसिंग भाटिया यास तीन वर्ष सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंड व ममरू यास तीन वर्ष सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल. या खटल्यात आरोपी मीराबाई हिला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. वन्य जीव विभागातर्फे अँड.एम.सी. जेस्वाणी, तर आरोपींतर्फे अँड.आर.बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
याप्रकरणी तत्कालीन उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी तथा नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे न्यायालयात उपस्थित होते.

Web Title: Three people imprisoned with international trafficking in Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.