पुलावर कार आदळून तिघे ठार
By admin | Published: March 14, 2017 09:48 PM2017-03-14T21:48:03+5:302017-03-14T21:48:03+5:30
भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले.
लोकमत आॅनलाईन
अहमदनगर, दि. 14 - भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. मयतापैकी दोघे संगमनेरचे व एक जामखेड तालुक्यातील आरणगावचा आहे.
संकेत संजय बोरा (वय १९) रा. आरणगाव , ता. जामखेड , प्रथमेश विष्णू भिंगारे (वय १९ ) रा.इंदिरादगर, संगमनेर व आदित्य श्रीगोपाळ तिवारी (वय १८, रा. देवाचा मळा, संगमनेर) असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघे पुणे येथे शिकत असून ते पुण्याहून संगमनेरकडे फियाट पुंटो कारने(क्र. एम.एच.२९ आर. ५४२५) येत होते. नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन येताना वाहनचालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावरील पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात संकेत व प्रथमेश दोघे जण गाडीतच अडकून पडले. त्यांचे मृतदेह परिसरातील गणेश राक्षे,मनोज राक्षे, संतोष मांडेकर , अभिषेक गुंजाळ, सुनिल ढगे या युवकांनी गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढले. तिसरा आदित्य तिवारी हा पुलालगत पडलेला होता. तिघांनाही मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विनय सरवदे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकूल वातावरणात मंगळवारी दुपारी संगमनेरच्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)