बेलापूरच्या पोलीस निरीक्षकासह तिघे गजाआड
By admin | Published: September 23, 2014 05:17 AM2014-09-23T05:17:10+5:302014-09-23T05:17:10+5:30
सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कार्यकर यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर गजाआड केले.
मुुंबई : सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कार्यकर यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर गजाआड केले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कार्यकर यांच्यासह बेलापूर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार भास्कर बोबले आणि त्याचा साथीदार (खाजगी) आरीफ अबीब मोहंमद शेख अशी आरोपींची नावे आहेत.
निवृत्त सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुंबई एसीबी विभागाने ही कारवाई केली. फिर्यादीविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात मालमत्तेसंदर्भात तक्रार आली होती. वरिष्ठ निरीक्षक कार्यकर यांनी फिर्यादीला अटक न करण्यासाठी व चॅप्टर प्रक्रिया सुरू न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ९० हजार स्वीकारण्याचे कबूल केले. तसेच ही रक्कम हवालदार बोबलेला देण्यास फिर्यादीला बजावले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने एसीबीच्या मुंबई विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीतील तत्थ्यता पडताळून एसीबीने गुन्हा नोंदवला.
आरोपींनी बेलापूरच्या सेक्टर ११ येथील एका हॉटेलच्या आसपास फिर्यादीला लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. एसीबीने तेथेच सापळा रचला. ठरल्याप्रकरणी फिर्यादी व आरोपींची भेट घडली. हवालदार बोबलेने फिर्यादीला ९० हजारांची रोकड खासगी साथीदार आरीफकडे देण्यास सांगितले. आरीफने ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्याने त्याच्यासह बोबलेला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर कार्यकर यांनाही गजाआड करण्यात आले, अशी माहिती एसीबीने दिली. (प्रतिनिधी)