अपहरणाचा आरोप असलेले 3 पोलीस निलंबित, 14 लाखाच्या लुटमारीचे प्रकरण
By admin | Published: March 15, 2017 09:35 PM2017-03-15T21:35:37+5:302017-03-15T21:35:37+5:30
चलनातून बाद झालेल्या 14 लाखांच्या नोटां हड़प करणारे नागपूर ग्रामीण मधील 3 पोलीस निलंबित करण्यात आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 15 - चलनातून बाद झालेल्या १४ लाखांच्या नोटां हड़प करणारे नागपूर ग्रामीण मधील 3 पोलीस निलंबित करण्यात आले. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी या पोलीस कर्मचा-यांची नावे असून, ते नागपूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्यावर शनिवारी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता.
८ मार्चला या तिघांनी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारिक शेख (नागपूर) आणि राजू तिरपुडे (खापरखेडा) तसेच विशाल नामक तरुण बसून असलेली कार रोखली होती. कारची झडती घेतल्या तेव्हा त्यात जुन्या (चलनातून बाद झालेल्या) ५०० आणि १००० च्या २८ लाखांच्या आढळल्या होत्या. त्या नोटा जप्त करून कायदेशिर कारवाई करण्याऐवजी या पोलिसांनी शारिक, राजू तसेच विशालला धाक दपट करून भेंडाळा गावाजवळ नेले. त्यानंतर त्यातील १४ लाख रुपये या तिघांनी काढून घेतले अन् कोणतीही कारवाई न करता तिघांना सोडून दिले. या प्रकरणाची तक्रार शारिकने गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्याकडे शनिवारी दुपारी केली. पुरंदरे यांनी लगेच पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांना माहिती दिली. प्रकरणाचा तपास सुरू होताच शेंडे, डांगे आणि नागरेने हे प्रकरण दडपण्यासाठी विशाल बानोडे आणि अन्ना नामक दलालांच्या माध्यमातून वरिष्ठ ;पोलीस अधिका-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती. लोकमतने हे प्रकरण रविवारी प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर रविवार रात्री उशिरा शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे या तिघांवर कलम ३६३ (अपहरण) आणि ३९२ (लुटमार) अन्वये सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह विशाल बानोडे आणि अण्णा नामक दलालाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. बानोडे यानेच या घटनेची पोलिसांना टीप दिली होती आणि त्यानेच नंतर दोन लाखांचे आमिष दाखवून प्रकरणात खोटी माहिती देऊन या तिघांच्या बचावाचा प्रयत्न केला होता, असे तपासात उघड झाले, त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली.
दरम्यान लोकमतने हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर आज बुधवारी या तिघांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
8 दिवसात 10 निलंबित
कर्तव्यात निष्काळजीपणा करून अवैध धंदेवाल्यांना खुली सुट देणा-या तीन पोलीस उपनिरीक्षक तसेच चार कर्मचा-यांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी 7 मार्चला निलंबीत केले होते. या घटनेला आज 8 दिवस झाले. त्यानंतर आता या तिघांना निलंबित करण्यात आले.
लोकमतचे वृत्त खरे ठरले
दोषी पोलिसांना बुधवारी निलंबीत केले जाईल, असे वृत्त आज लोकमतने प्रकाशित केले, ते खरे ठरले.